जिल्ह्यातील खरीप पेरणी आटोपण्याच्या मार्गावर!
By संतोष येलकर | Published: July 13, 2024 06:15 PM2024-07-13T18:15:15+5:302024-07-13T18:16:31+5:30
पावसानंतर गती : ३.७१ लाख हेक्टरवरील पेरणी आटोपली
संतोष येलकर, अकोला : गेल्या आठवड्यात दोन दिवस बरसलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरणीला गती आल्याने, शुक्रवार १२ जुलैपर्यंत ३ लाख ७० हजार ८५३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरणी आटोपली. उर्वरित ७२ हजार हेक्टरवरील पेरणी एक ते दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी जिल्ह्यात आटोपण्याच्या मार्गावर असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ४ लाख ४३ हजार हेक्टर इतके आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी अधून मधून बरसलेल्या पावसात गेल्या आठवड्यापर्यंत जवळपास ६० ते ६५ टक्के पेरणी आटोपली होती. पेरणीलायक सार्वत्रिक जोरदार पावसाअभावी जिल्ह्यातील उर्वरित पेरणी खोळंबली होती. गेल्या आठवड्यात ६ ते ८ जुलैदरम्यान तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला. त्यानंतर रखडलेल्या पेरणीला गती आली असून, १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८३.७० टक्के खरीप पेरणी पूर्ण करण्यात आली.
८३.७० टक्के अशी आटोपली पेरणी
पीक क्षेत्र (हेक्टर)
सोयाबीन २,०३,७६०
कापूस १,१२,०४१
तूर ५२,१३१
उडीद १,३०५
मूग १,२३९
ज्वारी २८०
मका ६४
तीळ ३२
७२ हजार हेक्टरवरील पेरणी दोन दिवसांत पूर्ण होणार ?
जिल्ह्यातील एकूण ४ लाख ४३ हजार खरीप पेरणी क्षेत्रापैकी १२ जुलैपर्यंत ३ लाख ७० हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी आटोपली असून, उर्वरित ७२ हजार १४७ हेक्टरवरील पेरणी १३ व १४ जुलै रोजी या दोन दिवसांच्या कालावधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
१९३ मेट्रिक टन संरक्षित खतसाठा होणार मुक्त !
जिल्ह्यातील खरीप पेरणी आटोपण्याच्या मार्गावर असतानाच उगवलेल्या पिकांसाठी रासायनिक खतांची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १९३ मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा सोमवारपर्यंत विक्रीसाठी मुक्त करण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार संबंधित संरक्षित खतसाठा मुक्त करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संरक्षित खतसाठा मुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी दिली.