किडनी ब्रोकरचे जाळे राज्यभर!
By admin | Published: December 8, 2015 02:22 AM2015-12-08T02:22:29+5:302015-12-08T02:22:29+5:30
किडनी तस्करी ; मुंबई, पुण्यातील नामांकित हॉस्पिटलशी कोळीचा संपर्क .
नितीन गव्हाळे / अकोला : किडनी तस्करी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ नागपूर, औरंगाबाद, सांगलीपर्यंंतच र्मयादित नसून, थेट मुंबई, पुण्यापर्यंंत पोहोचले असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या प्रॉपर्टी ब्रोकरसारखा व्यवहार करणारा या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवाजी कोळी याचा राज्यभर फिरून किडनी विकण्याचा गोरखधंदा असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर म्हटले आहे.
शिवाजी कोळी हा किडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार म्हणून समोर आला आहे. त्याला अटक केल्यानंतर ध क्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. कोळीला पोलीस कोठडीत घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर दिलेली माहिती धक्कादायक आहे. या माहितीनुसार, कोळीने आतापर्यंंत १२ ते १५ व्यक्तींच्या किडन्या काढून, मुंबई, पुणे, रायगड, सातारा, सांगली, यवतमाळ, नागपूर, किनवट येथील किडनी निकामी झालेल्या रूग्णांच्या शरीरात प्रत्यारोपण केले. त्यासाठी तो राज्यभरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये फिरून कोळी किडनी निकामी झालेले रुग्ण शोधायचा. तो मुख्यत्वे धनाढय़ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्याच्याकडे किडनी दाता असल्याचे सांगायचा.
किडनी निकामी झालेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईक, कुटुंबीय कोळीने मागितलेली रक्कम मोजायला तयार व्हायचे. अशा रूग्णांच्या शोधात तो नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथील नामांकित हॉस् िपटलमध्ये नेहमी संपर्क ठेवायचा. आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून पैशांची निकड असलेल्या व्यक्तींना हेरायचे, त्यांना चार ते पाच लाख रूपयांचे आमिष दाखवून किडनी विक्रीसाठी भाग पाडायचे आणि धनाढय़ रुग्णांना ती किडनी १0 ते १५ लाख रूपयात विकायची, अशी कोळीची कार्यपद्धती तपासात समोर आली आहे. आता पोलीस कोळीच्या संपर्कातील मुंबई, पुण्यातील हॉस्पिटल तसेच त्याच्याकडून किडनी खरेदी केलेल्या रुग्णांपर्यंंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.