धामणदरीत किडनी आजाराचा उद्रेक

By admin | Published: July 7, 2017 01:52 AM2017-07-07T01:52:25+5:302017-07-07T01:52:25+5:30

युवा शेतकऱ्याचा मृत्यू : दहा वर्षांत गेले सात बळी; ११ जण आजारी

Kidney Disease Outbreak | धामणदरीत किडनी आजाराचा उद्रेक

धामणदरीत किडनी आजाराचा उद्रेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील धामणदरी व केशव नगर (जुनी धामणदरी) या गावात किडनी आजाराचा उद्रेक झाला असून, ५ जुलैच्या रात्री दोन्ही किडन्या निकामी झालेल्या युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मागील १० वर्षांत येथे किडनी रोगाने घेतलेला हा सातवा बळी आहे.
मृतक मनोहर भीमराव राठोड (३६) या शेतकऱ्याला किडनीचा आजार झाल्यानंतर त्याला अकोला व मुंबई येथे उपचारार्थ पाठविण्यात आले होते; परंतु गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची स्थिती गंभीर झाल्याने अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. अखेर ५ जुलैच्या रात्री त्यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

११ जणांना किडनी आजाराने ग्रासले!
सध्या या दोन्ही गावांतील ११ जण किडनी आजाराने त्रस्त आहेत. काही जणांवर विविध खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांमध्ये शकोणाबाई चरणदास राठोड, विजय पांडू राठोड, वच्छला हरिभाऊ राठोड, सुमित्रा मोहन राठोड, सौरव बाबुसिंग जाधव (वय पाच वर्षे), बाबुसिंग मंगू राठोड, विमला रामचंद्र राठोड, वनिता गोकूळ राठोड, प्यारीबाई प्रल्हाद जाधव, दयाराम रामदास पवार, अंबादास भावसिंग राठोड आदींचा समावेश आहे.

क्षारयुक्त पाण्यामुळे पसरला आजार
केशव नगर (जुनी धामणदरी) येथे पिण्याच्या पाण्याचे स्रोत म्हणून गल्लोगल्लीत ५ ते ७ फूट खोलवर पाणी असून, ते अतिक्षारयुक्त असल्याचे यापूर्वीच प्रयोगशाळेतील पाणी नमुना तपासणीतूनच समोर आले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

दहा वर्षांत किडनीचा सातवा बळी
गेल्या दहा वर्षांत या मृत्यूसह किडनी आजाराने सात जणांचा बळी घेतला असून, यामध्ये हंजारी जोधा पवार, मांगीबाई प्रल्हाद पवार, तानाबाई झिंगाजी करवते, पांडू रामू राठोड, साक्रीबाई सवाई जाधव, काशीराम नरसिंग राठोड, मनोहर भीमराव राठोड आदींचा समावेश आहे.

चिमुकल्या आराध्याचे पितृछत्र हरविले!
युवा शेतकरी मनोहर राठोड यांच्या मृत्यूमुळे तीन वर्षांची चिमुकली आराध्या हिचे पितृछत्र हरविले आहे. जीवनाचा अर्थ कळण्यापूर्वीच तिचे पितृछत्र हरवले. त्यांच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे.

Web Title: Kidney Disease Outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.