किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेत!

By admin | Published: December 4, 2015 02:33 AM2015-12-04T02:33:52+5:302015-12-04T02:33:52+5:30

अकोल्यातील किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेपर्यंंत; नागपुरातील डॉक्टरवर संशयाची सुई

Kidney smugglers racket in Sri Lanka! | किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेत!

किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेत!

Next

सचिन राऊत/अकोला : अकोल्यातील किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेपर्यंंत पोहोचल्याचे वास्तव बुधवारी समोर आले. किडनी प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रियाच श्रीलंकेत केली जात असल्याचे या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केल्यानंतर उघड झाले आहे. किडनी तस्करीच्या गोरखधंद्यात अकोल्यातील एक रॅकेट नियोजनबद्धरित्या कार्यरत आहे. गरजू, गरिबांना हेरायचे, त्यांना आधी व्याजाने पैसे द्यायचे. त्यावर चक्रीवाढ पद्धतीने व्याज आकारून थकबाकीची रक्कम फुगवायची. एकदा का सावज पूर्णत: अडकला की, पैशासाठी त्याला जीवे मारण्याची धमकी देणे, कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याची भीती दाखविणे, असे प्रकार किडनी तस्करांकडून केले जातात. शिकार पूर्णत: शरण आल्यानंतर त्याला आणखी ३ ते ४ लाख रुपयांचे आमिष दाखवून त्याला किडनी काढण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान हे रॅकेट करते. त्यासाठी श्रीलंकेतील कोलंबो शहरातील डॉक्टरांशी संपर्क साधून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाते. डॉक्टरांची तारीख निश्‍चित झाली की, नागपूरमधील एका डॉक्टरकडे रूग्णाच्या सर्व तपासण्या रॅकेटकडून केल्या जातात. तपासण्या आटोपताच ज्याला किडनीची गरज आहे, ती व्यक्ती रक्कम देण्यास तयार होते. त्यानंतर नागपूर येथेच तत्काळ पासपोर्ट काढून रूग्णाला श्रीलंकेत नेण्यात येते. तेथील नवलोक हॉस्पिटलमध्ये रूग्णाची किडनी काढली जाते. अशाच प्रकारातून जुने शहरातील ज्या दोघांची किडनी काढण्यात आली, त्यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे. अकोल्यातील किडनी तस्करीचे हे रॅकेट केवळ भारतातच नसून आणखी काही देशांमध्ये त्याचे धागेदोरे असल्याचे तपासात समोर आले आहे. श्रीलंका हे या किडनी तस्करांचे मुख्यालय असून, हे मुख्यालय नागपुरातील एका डॉक्टरच्या इशार्‍यावर काम करीत असल्याचे समोर आले आहे.

*पुणे व आंध्र प्रदेश कनेक्शन

किडनी काढणार्‍याच्या ज्याप्रमाणे नागपूरमध्ये तपासण्या करण्यात येतात, त्याचप्रमाणे पुणे व आंध्र प्रदेशमध्येही तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती उजेडात आली आहे. किडनी तस्करांनी जाळय़ात अडकवलेल्या एका सावजाची किडनी प्रत्यारोपणाची तयारी श्रीलंकेत झाली होती; मात्र तत्पूर्वी त्याची तपासणी पुणे व आंध्र प्रदेशमधील हैदराबाद या ठिकाणी करण्यात येणार होती, असे तपासात समोर आले आहे.

*पासपोर्ट जप्त

देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी संतोष गवळी व संतोष कोल्हटकर नामक दोघांच्या किडन्या काढल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी देवेंद्र शिरसाटच्या हरिहरपेठ येथील घरातून तीन पासपोर्ट जप्त केले आहेत. त्यापैकी एक पासपोर्ट शिरसाटचा, उर्वरित दोन संतोष गवळी व संतोष कोल्हटकर यांचे आहेत. गवळी व कोल्हटकर हे दोघेही श्रीलंकेत जाऊन आल्याचे तपासात समोर आले असून, त्या दोघांच्याही किडनी काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Kidney smugglers racket in Sri Lanka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.