किडनी तस्करी प्रकरणाच्या चौकशीत आरोग्य संचालकांचा खोडा!
By Admin | Published: February 24, 2016 01:43 AM2016-02-24T01:43:39+5:302016-02-24T01:43:39+5:30
पाच वेळा पत्र देऊनही स्पष्ट मार्गदर्शन मिळेना; डॉक्टरांना वाचविण्यासाठी आटापिटा.
अकोला: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या किडनी तस्करी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोग्य संचालकांना पाच वेळा पत्र देऊन मार्गदर्शन मागण्यात आले आहे; मात्र आरोग्य संचालकांनी गत दोन महिन्यांमध्ये या प्रकरणातील पुढील कारवाईसंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन न केल्याने तपासात खोडा निर्माण झाला आहे. आरोग्य संचालक स्पष्ट मार्गदर्शन न करीत असल्याने किडनी तस्करी प्रकरणात अवयव तस्करीसह विविध गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना अडचणी येत आहेत.
डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आनंद जाधव, देवेंद्र शिरसाट व किडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी या तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आलेल्या पुराव्यावरून कलम ३७0 नुसार गुन्हय़ात वाढ करण्यात आली; मात्र आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात तांत्रिक मुद्यांची उकल करण्यासाठी तसेच मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार आणखी कोणते गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राज्याचे आरोग्य संचालक सतीश पवार यांना ५ डिसेंबर २0१५ पासून ते आतापर्यंंत ५ वेळा पत्र देऊन मार्गदर्शन मागितले. दोन महिने या पत्राला केराची टोपली दाखविणार्या आरोग्य संचालकांनी ६0 ते ६५ दिवसानंतर थातूर-मातूर उत्तर पाठविले असून, त्यामध्ये किडनी तस्करांवर तसेच दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी किंवा करू नये, हे स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे या तपासात आता आरोग्य संचालकांनीच खोडा निर्माण केला असून, अवयव तस्करीचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना अडचणीत आणले आहे. या प्रकरणात आरोग्य संचालकांनी नियमाने अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट पत्र न्यायाधीशांच्या नावे किंवा पोलिसांना देणे अपेक्षित आहे; मात्र दोन महिन्यांच्या कालावधीनंतरही हे स्पष्ट पत्र न दिल्याने किडनी तस्करी प्रकरणाचा तपास थंडावलेला आहे. आरोग्य संचालकांनी डॉक्टरांना वाचविण्यासाठी हा आटापिटा सुरू केल्याची माहिती असून, त्यामुळेच त्यांनी हे प्रकरण अडगळीत ठेवल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.