किडनी तस्करी: किडनी विक्रीचा सौदा करणाऱ्या युवकाच्या चुलत भावानेही केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:37 PM2019-09-20T14:37:02+5:302019-09-20T14:37:13+5:30
दोनच महिन्यांपूर्वी जुलै २०१९ मध्ये अतुलचाच चुलत भाऊ तसेच पुण्यातील त्याच्याच कंपनीत कार्यरत असलेल्या धीरज संतोष मोहोड यांनीही आत्महत्या केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे.
अकोला: बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदा येथील रहिवासी असलेल्या अतुल मोहोड यांनी किडनी तस्करी रॅकेटच्या दबावापोटी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असतानाच तत्पूर्वी म्हणजेच दोनच महिन्यांपूर्वी जुलै २०१९ मध्ये अतुलचाच चुलत भाऊ तसेच पुण्यातील त्याच्याच कंपनीत कार्यरत असलेल्या धीरज संतोष मोहोड यांनीही आत्महत्या केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पुण्यात एकाच कंपनीत कार्यरत असलेल्या दोन भावंडांनी दोन महिन्यांच्या कालावधीत आत्महत्या केल्याने सदर प्रकरण गंभीर वळणार असल्याची माहिती आहे.
अतुल मोहोड यांनी आत्महत्येपूर्वी डॉक्टर डेव्हीडशी जे व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग केले. ते चॅटिंग पोलिसांनी तपासले असून, यामध्ये अतुलची डॉक्टर डेव्हीड याने फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे समोर येत आहे. एवढेच नव्हे, तर पुण्यातील डॉ. डेव्हीडने किडनीच्या इन्श्युरन्ससाठीही ९० हजार रुपयांची मागणी केल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
एका किडनीवर माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो, याबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. जेव्हा अतुलने पैसे संपले आहेत, आता पैशाची व्यवस्था करणे कठीण असल्याचे डॉक्टरला सांगितले, त्यानंतरच डेव्हीडने दुसरा किडनी देणारा तयार असल्याने अतुलची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे अतुल आणि डॉक्टरमध्ये झालेला व्यवहार संपल्याचे म्हणून लुबाडलेले सुमारे दोन लाख रुपये परत करण्यास डॉक्टरने नकार दिल्यानंतर अतुलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्यापही पाहिजे तशी गती दिली नसल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला.
दोघांच्या आत्महत्येमागे गुपित काय?
आळंदा येथील अतुल मोहोडने त्याचाच चुलत भाऊ धीरज संतोष मोहोड याला तो ज्या कंपनीत कामाला आहे, त्याच कंपनीत कामाला लावल्याची माहिती आहे. दोघेही एकाच कंपनीत कार्यरत असताना एका महिन्यापूर्वी धीरजने कंपनीतच गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर लगेच अतुलनेही आत्महत्या केली. या दोघांच्याही आत्महत्येमागे मोठे गुपित असून, त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
आयसीआयसीआय बँकेसह तिघांविरुद्ध तक्रार
मृतक अतुलचा भाऊ विजय अजाबराव मोहोड यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तिघांची तक्रार दिली. त्यात त्यांनी भावाच्या मृत्यूला डॉक्टर डेव्हीड जेमई, विकास तिवारी व किडनी रॅकेटमधील मृत्यूस प्रवृत्त करणारे व्यक्ती आणि आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.