किडनी तस्करी प्रकरणात पथक दिल्लीला; एकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:30 PM2019-09-23T12:30:06+5:302019-09-23T12:30:12+5:30
तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
अकोला : आळंदा येथील युवकाने एका डॉक्टरच्या किडनी तस्करीतील दबावामुळे आत्महत्या केल्यानंतर बार्शीटाकळी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
आळंदा येथील अतुल मोहोड या युवकाने १७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने शेतातील पाइपवर तसेच एका चिठ्ठीत त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या विकास तिवारी व दिल्ली येथील डॉक्टर डेव्हिड यांचा उल्लेख केला होता. डॉक्टर डेव्हिडने त्याची किडनी विकत घेण्याच्या मोबदल्यात त्याच्याकडून दोन लाख रुपये उकळले व त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. विकास तिवारी याच्याकडेही पैशाचा व्यवहार होता. असे अतुलने चिठ्ठीत नमूद केले होते. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला; मात्र या प्रकरणात युवकाने चिठ्ठीत दोघांची नावे लिहिली असताना पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने युवकाच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बार्शीटाकळी पोलिसांचे एक पथक पुणे येथे गेले होते. तेथे त्यांनी विकास तिवारी याची चौकशी केली आणि काही दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती आहे.