आता अकोल्यातही किडनी प्रत्यारोपण शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 10:33 AM2021-02-02T10:33:52+5:302021-02-02T10:34:02+5:30
Kidney transplant is now possible in Akola शहरातील एका खासगी रुग्णालयाला किडनी प्रत्यारोपणासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे.
अकोला : राज्यातील इतर मोठ्या शहरांप्रमाणेच आता अकोल्यातही किडनी प्रत्यारोपण शक्य होणार आहे. गतवर्षी शहरातील एका खासगी रुग्णालयाला किडनी प्रत्यारोपणासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. देशात २ फेब्रुवारी रोजी किडनी प्रत्यारोपणाची पाच दशके पूर्ण होत असताना अकोल्यातही हे प्रत्यारोपण शक्य होणार असल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबादव्यतिरिक्त विदर्भात नागपूर येथे किडनी प्रत्यारोपण शक्य आहे. अमरावती येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातही ही शस्त्रक्रिया शक्य आहे, मात्र अकोल्यात केवळ किडनी दात्याकडून किडनी संकलन शक्य होते.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाच्या परवानगीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. २०२० मध्ये या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली होती. परंतु, कोरोनामुळे जिल्ह्यात किडनी प्रत्यारोपणाची एकही शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णांना आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज नाही.
अकोला जीएमसीला किडनी संकलनाचीच परवानगी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला किडनी संकलनाची परवानगी आहे. मात्र, आतापर्यंत एकाही रुग्णासाठी सर्वोपचार रुग्णालयात किडनी संकलन करण्यात आले नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक पातळीवर उपलब्ध सुविधा
भारतात किडनी प्रत्यारोपणाला आज ५० वर्षे पूर्ण होत असून, या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे किडनी प्रत्यारोपण आणखी सहज शक्य झाले. मात्र, आजही अनेकांमध्ये किडनी प्रत्यारोपणाविषयी अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. मोठ्या शहरांप्रमाणे आता अकोल्यातही किडनी प्रत्यारोपणाला शासनाने मान्यता दिली आहे.
- डॉ. प्रशांत मुळावकर, मानद सचिव, युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभाग, अकाेला