धुलीवंदनाच्या दिवशी हत्या; बापलेकांना पाच वर्षांचा कारावास
By आशीष गावंडे | Published: January 6, 2024 09:55 PM2024-01-06T21:55:23+5:302024-01-06T21:56:38+5:30
तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला यांना दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
अकोला: धुलीवंदनाच्या दिवशी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून संतोष रामभाऊ वाघमारे यांची २४ मार्च २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश शयना पाटील यांनी आरोपी चंद्रकांत उर्फ छोटू त्र्यंबक पवार (३८) व त्र्यंबक विष्णू पवार (६५) दोघेही राहणार वाघजाळी, तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला यांना दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी मृतक संतोष रामभाऊ वाघमारे हे सकाळी साडेअकराच्या सुमारास गावठाण परिसरातून घरी जात असताना वाघजाळी येथील आरोपी चंद्रकांत उर्फ छोटू त्र्यंबक पवार यांनी मृतकास हटकले. धुलीवंदन असल्यामुळे दारू पाजण्यासाठी आग्रह धरला. त्यावर संतोष वाघमारे यांनी नकार दिला असता आरोपी चंद्रकांत याने संतोष याला मारहाण सुरू केली. त्याचवेळी आरोपीचे वडील विष्णू पवार यांनी सुद्धा मृतक संतोषला लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पोटावर तसेच नाकावर मारहाण करून डांबरी रोडवर पाडले. या मारहाणीत मृतकाच्या नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव झाला. त्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी मृतकाच्या काकाने बार्शीटाकळी येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपी विरोधात कलम ३०४ (२) सहकलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे व अतिरिक्त सरकारी वकील आशिष फुंडकर यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या वतीने कोर्ट पैरवी पोलीस हवालदार प्रदीप पिंजरकर, संतोष उंबरकर यांनी सहकार्य केले.