काँग्रेसच्या किसान युवती सेलच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:40+5:302021-03-22T04:16:40+5:30
अकाेला येथील कु. प्रिया दिलीप लोडम यांची काँग्रेस पक्षाची शेतकरी आघाडी असलेल्या राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या युवती सेलच्या विदर्भ समन्वयकपदी ...
अकाेला
येथील कु. प्रिया दिलीप लोडम यांची काँग्रेस पक्षाची शेतकरी आघाडी असलेल्या राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या युवती सेलच्या विदर्भ समन्वयकपदी
नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या शिफारशीवरून राष्ट्रीय किसान काँग्रेसने मान्यता दिल्यानंतर किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष देवानंद पवार यांनी कु. प्रिया लोडम यांना नियुक्तीपत्र दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई येथील कार्यालयात नाना पटाेलेे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या आवश्यक
अकाेला शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्त असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या येत्या आठ दिवसांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. तसेच ग्रामीण स्तरावर कोविड चाचण्या वाढविण्यात याव्यात, यासाठी जनजागृती करण्यात यावी. महानगरपालिका क्षेत्रातील चारही झोनमध्ये मोबाइल कोविड तपासणी व्हॅन फिरत असून नागरिकांनी आपल्या कोविड तपासण्या करून घ्याव्या, अशाही सूचना त्यांनी दिल्यात.
क्रोमाॅर्बीट लोकांची यादी तयार करा
अकाेला प्राथमिक आरोग्य केंद्रावर आशा सेविकांमार्फत गावातील ४५ वर्षांवरील क्रोमाॅर्बीट लोकांची यादी तयार करून त्यांना लसीकरण करण्यात यावे. जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रे सहाही दिवस सकाळी १० ते लसीकरण होईपर्यंत सुरू ठेवावे. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसेवकाव्दारे जनजागृती करून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्यात.
क्रीडा गुण देण्यात यावे
अकोला येथे काेराेनामुळे खेळ बंद आहेत, त्यामुळे होतकरू खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण सवलत त्वरित देण्यात यावी, अशी मागणी अकोला जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत व अमित देशमुख यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे
वीजदरवाढ विराेधात आंदाेलन
अकोला शेतकऱ्यांची कृषीपंपाची वीज तसेच ग्रामस्थांची वीजकपात तसेच अकोला महानगरातील नागरिकांची, गोरगरिबांची अठरापगड जाती, बाराबलुतेदारांची वीजकपात केली असून वीजदरांमध्ये वाढ करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम वीजवितरण कंपनी व शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सरकारने केले आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपने दिली आहे.
खंडणीसाठीच बार सुरू, मंदिरे बंद
अकाेला काेविडच्या काळामध्ये सर्व व्यवहार सुरू होते, मंदिरे बंद का होती, याचे उत्तर परमवीर सिंग यांच्या पत्रामुळे सिद्ध झाले आहे. आता ही मंदिरे बंद आहेत, पब आणि बार रेस्टॉरंट सुरू आहे. हे का सुरू होते, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचा उद्देश काय होता, हे सिद्ध झाले आहे, असा टाेला आमदार गोवर्धन शर्मा यांनी लगावला आहे. अकोला जिल्ह्यासह अनेक भागांतील मंदिरे सुरू करण्यात यावी. शिवरात्रीच्या पर्वावर मंदिरांनी आपले व्यवस्थापन सिद्ध केले आहे. त्यामुळे मंदिरे सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी रामनवमी शोभायात्रा समितीने केली आहे.