किसनराव हुंडीवाले हत्याकांडात ५६५ पानांचे दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:10 PM2019-08-11T12:10:20+5:302019-08-11T12:10:27+5:30
किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले.
अकोला : अखिल भारतीय महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची ६ मे रोजी निर्घृण हत्या केल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. या हत्याकांडाचे दोषारोपपत्र ५६५ पानांचे असून, १० आरोपी अटकेत आहेत. तीन आरोपी अद्यापही फरार असून, दोन महिला आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहीरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे व साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली तर सतीश तायडे, विशाल तायडे, मयूर अहीर, दिनेश ठाकूर, प्रतीक तोंडे या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने सूरज प्रल्हाद गावंडे यास बुलडाणा जिल्ह्यातील अटक केली होती. या आरोपींना सहकार्य करणाऱ्या दीपाली छोटू गावंडे आणि अम्रिता प्रवीण गावंडे या दोन महिलांनाही आरोपी करण्यात आले होते; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने व त्यांच्या पथकाने करून ५६५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
चार आरोपींच्या जामिनावर सुनावणी
या हत्याकांड प्रकरणात प्रवीण गावंडे, राजपूत व आणखी दोन जणांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.