किशोर बळी यांच्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:16 PM2018-06-06T13:16:06+5:302018-06-06T13:16:06+5:30
अकोला : सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या 'प्रभात' ह्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'सुलभभारती' ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ह्या कवितेची निवड केली आहे.
अकोला : सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या 'प्रभात' ह्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'सुलभभारती' ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ह्या कवितेची निवड केली आहे. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या किशोर बळी यांची पहाटेच्या प्रतीक्षेत,पाकळ्या, अक्षरांचे सूर, धुम्मस, आणि माझ्या बालमित्रांनो ही पुस्तके प्रकाशित आहेत. गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांच्या मैफिलीचे निवेदक, वऱ्हाडी बोलीतील स्तंभलेखक, चित्रपट गीतकार - अभिनेते तसेच 'हास्यबळी डॉट कॉम' ह्या विनोदी कार्यक्रमाचे सादरकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. नुकतेच युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले असून यंदा त्यांचा अ.भा.साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनात सहभाग होता. "ज्यांच्या कविता वाचत मी लहानाचा मोठा झालो, त्या जगदीश खेबुडकर, वसंत बापट, शांता शेळके यांच्या कवितांसोबत माझी कविता अभ्यासक्रमात असावी आणि राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी ती तालासुरात गुणगुणावी, हे माझ्या शब्दांचे भाग्य आहे", अशी प्रतिक्रिया किशोर बळी यांनी व्यक्त केली आहे. अकोल्यातील प्रभात किड्स् ह्या शाळेने ही कविता आपले 'थीम साँग' म्हणून स्वीकारली आहे, हे विशेष.