सासरी येण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर चाकुहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:56+5:302021-07-26T04:18:56+5:30
बाळापूर : तालुक्यातील खामखेड येथे माहेरी राहत असलेल्या २५ वर्षीय पत्नीस पतीने सासरी येण्यास चल म्हटले ...
बाळापूर : तालुक्यातील खामखेड येथे माहेरी राहत असलेल्या २५ वर्षीय पत्नीस पतीने सासरी येण्यास चल म्हटले असता पत्नीने नकार दिल्याने संतप्त पतीने चाकूने सपासप वार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
खामखेड माहेर असलेल्या व लोणी (गुरव) सासर असलेल्या मयूरी शुद्धोधन दामोदर हिला पती शुद्धोधन चोरणाजी दामोदर (३२) हा दि. २४ जुलै रोजी पत्नीला घेण्यासाठी सासरी आला. माहेरील मंडळीने मयूरीला पाठविण्यास नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या शुद्धोधनने पत्नीचा पाठलाग करून तिला चाकूने भोसकले. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रविवारी तिला नागपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. तिला दोन मुले असून, ती पतीजवळ सासरी राहतात. पतीला दारूचे व्यसन असून तो नेहमी मारहाण करीत असल्याने मयूरी माहेरी राहत होती. जखमी मयूरीचा मामा विनोद बाळकृष्ण इंगळे यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी आरोपी शुद्धोधन दामोदर (रा. लोणी गुरव, ता. खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाळापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुईकर यांनी तातडीने आरोपीला अटक करून चाकू जप्त केला आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.