अकोला जिल्ह्यातील १६३२१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान विज्ञान परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:38 PM2019-09-15T12:38:14+5:302019-09-15T12:38:25+5:30
१४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १८९ केंद्रावर ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात आली.
अकोला : जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व तालुका विज्ञान अध्यापक मंडळातर्फे शनिवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १८९ केंद्रावर ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील १६ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
विद्यार्थ्यांची एनटीएसई परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, या उद्देशाने ही परीक्षा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. परीक्षेमध्ये बुद्धीमत्ता चाचणी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य ज्ञान व पर्यावरण या विषयावर ५० गुणांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ६० मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यामध्ये स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीसीएसई आदी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. ही परीक्षा इयत्ता ५ व ६ ‘अ’ गट, इयत्ता ७ व ८ ‘ब’गट आणि इयत्ता ९ व १० ‘क’ गट अशा तीन गटातून घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक गटातून १३५ विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार जिल्हा स्तरावर निवड करण्यात येईल. यातील गुणवत्तेनुसार इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यम अशी गुणवत्ता यादी तयार करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल. त्यामधून प्रत्येक गटातून पाच विद्यार्थ्यांची निवड होईल. त्यांना एकदा ५०० रुपये शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. शनिवारी झालेल्या परीक्षेवेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, विज्ञान पर्यवेक्षक गजानन लाजुळकर, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, प्राचार्य माधव मुनशी यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली.
तालुकानिहाय केंद्र व विद्यार्थी
तालुका - परीक्षा केंद्र - विद्यार्थी
अकोला (शहर) - ३७ - ४९०५
अकोला (ग्रामीण) - १४ - ७६८
पातूर - २८ - १९०५
अकोट - २९ - २६८०
तेल्हारा - २० - २०२८
बाळापूर - १६ - १५६२
मूर्तिजापूर - २९ - १५६३
बार्शीटाकळी - १६ - ९१०