नियोजनशून्यतेमुळे कोल्हापुरी बंधारा कोरडाठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:36+5:302021-04-02T04:18:36+5:30
वाडेगाव : येथील निर्गुणा नदीच्या पात्रात बांधलेला कोल्हापुरी बंधारा लघुसिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे कोरडाठाक पडला आहे. गत अनेक ...
वाडेगाव : येथील निर्गुणा नदीच्या पात्रात बांधलेला कोल्हापुरी बंधारा लघुसिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे कोरडाठाक पडला आहे. गत अनेक वर्षांपासून तुटलेल्या गेटच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पाणी वाहून गेल्याने वाडेगाव व परिसरातील गावांमध्ये आज रोजी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील निर्गुणा नदीवरील कोल्हापुरी बंधारा परिसरासाठी वरदान ठरला आहे. वाडेगाव, देगाव, मानकी, नकाशी, भरतपूर, खिरपुरी, बारलिंगा आदी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची जलपातळी वाढण्याच्या दृष्टीने हा बंधारा महत्त्वापूर्ण आहे. तसेच सिंचन व वापरण्याच्या पाण्यासाठीही बंधारा उपयोगी ठरत आला आहे. पावसाळ्यात मोठा जलसंचय होतो. तथापि, बंधाऱ्याचे गेट आता जीर्ण झाल्यामुळे त्यामधून पाणी वाहून जाते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच बंधाऱ्याने तळ गाठल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या वाडेगावला खैवाडी तामशी, पाच देवूळ व चान्नी फाटा येथील विहिरीतून तसेच दोन विंधनविहिरींमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु हा पाणीपुरवठा अपूर्ण पडत आहे. गावातील काही भागात वीस ते पंचवीस दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
पाणी अडविण्यासाठी ताडपत्रीचा आधार
कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्व गेट जीर्ण झाले असून, काही गेट तुटून पडले आहेत. गेटच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ दरवर्षी लोकवर्गणीतून उच्च दर्जाची ताडपत्री खरेदी करून, बंधाऱ्याच्या गेटला त्याचे आवरण करतात. यामुळे पाणी अडविले जाते. हा प्रकार मर्यादित कालावधीसाठी उपयोगी असला, तरी दीर्घकालीन साठवणुकीसाठी नवीन गेट बसविणे गरजेचे आहे.
वीस-पंचवीस दिवस झाले तरी नळाला पाणी आले नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जास्त दिवस साठवून ठेवलेले पाणी प्यावे लागत आहे. हे आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे.
जान्हवी राजेंद्र घाटोळ, ग्रामस्थ
नदीवरील धरणाचे पाणी सोडण्यात आले तर बंधाऱ्यात पाणी येईल व पाणीटंचाई बाबतीत मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
केशव सरप, ग्रामस्थ
धरणातून पाणी सोडण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधित विभागाला पत्र सादर केलेले आहे. लघुसिंचन विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला तर नागरिकांना दिलासा मिळेल.
सचिन धनोकार,
ग्रामपंचायत सदस्य