भारत-पाक सामन्यावर कोट्टय़वधींचा सट्टाबाजार
By admin | Published: June 5, 2017 02:10 AM2017-06-05T02:10:19+5:302017-06-05T02:10:19+5:30
जिल्हय़ात ५0 च्यावर सट्टा माफियांचे जाळे
सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळख असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रविवारी खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर अकोला शहरासह जिल्हय़ात कोट्टय़वधी रुपयांच्या सट्टय़ाची उलाढाल झाली. जिल्हय़ात तब्बल ५0 च्यावर सट्टा माफिया सक्रिय झाले असून, त्यांनी रविवारच्या सामन्यावर मोठय़ा प्रमाणात सट्टाबाजार चालविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जिल्हय़ातील सट्टा माफियांचे जाळे राज्यासह देशपातळीवर आहेत. क्रिकेट सामन्यांवर मोठय़ा प्रमाणात सट्टाबाजाराची उलाढाल होत असल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा अकोल्यात दाखल होताच त्यांनी सट्टा माफियांच्या मुसक्या आवळल्या होत्या. बड्या सट्टा माफियांवर कायद्याचा बडगा उगारत मीणा यांनी अकोल्यातील सट्टा माफियांना पळता भुई थोडी केली, त्यामुळे सट्टा माफियांनी त्यांचे बस्तान गुंडाळत अकोल्यातून हा धंदा बंद केला होता; मात्र त्यांची बदली झाली आणि नव्यानेच आलेल्या पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हय़ातील गुन्हेगारीचा पूर्ण अभ्यास सुरू केला.याच संधीचा फायदा घेत सट्टा माफियांनी काही पोलीस अधिकार्यांशी सलगी करीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळल्या जाणार्या क्रिकेट मॅचवर सट्टाबाजार चालविण्याचा मोठा गोरखधंदा पुन्हा सुरू केला. सट्टा माफियांचा मोठा बाजारच जिल्हय़ात सुरू असताना एकाही पोलीस अधिकार्याकडून कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. एक हजार आणि दोन हजार रुपयांची दारू पकडण्यातच पोलीस धन्य मानत असल्याचे त्यांच्या कारवाईवरून दिसून येत आहे. जिल्हय़ात भारत-पाकिस्तान सामन्यावर कोट्टय़वधी रुपयांचा सट्टाबाजार सुरू असतानाही पोलीस अधिकार्यांना याची माहिती नसणे, हे आश्चर्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तब्बल ५0 च्यावर सट्टा माफियांकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टाबाजार खेळण्यात आल्याचे वास्तव आहे. शहरासह जिल्हय़ात ही मोठी उलाढाल रविवारी दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंंत सुरू असताना पोलीस मात्र मूग गिळून बसले होते.
सामन्यादरम्यानच्या पावसावरही मोठा सट्टा
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान नऊ ओव्हर झाल्या असतानाच पाऊस आला. त्यानंतर पूर्ण सामना होईपर्यंंत किती वेळा पाऊस येईल, यावरही सट्टा खेळण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ५0 ओव्हरचा खेळण्यात येणारा सामना किती ओव्हरचा खेळल्या जाईल, यावरही सट्टाबाजारात मोठी उलाढाल झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासोबतच पाकिस्तानने टाकलेल्या अंतिम षटकातील तीन षटकारांवर लाखोंची उलाढाल झाली.