३०० रुपयांची लाच घेणाऱ्या कोतवालास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:17+5:302021-08-18T04:25:17+5:30
अकोला तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये कार्यरत असलेला कोतवाल भानुदास मारुती बाभूळकर याने एका तक्रारदारास त्याच्या काकाच्या शेतजमिनीचा फेरफार देण्यासाठी ...
अकोला तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये कार्यरत असलेला कोतवाल भानुदास मारुती बाभूळकर याने एका तक्रारदारास त्याच्या काकाच्या शेतजमिनीचा फेरफार देण्यासाठी २०० रुपयांची लाच मागितली तसेच फेरफारची नोंद घेऊन तो फेरफार पुन्हा तक्रारकर्त्यास देण्यासाठी १०० रुपये मागितले. तक्रारकर्त्याकडे अशाप्रकारे एकूण ३०० रुपयांची लाच मागण्यात आली; तक्रारकर्त्याने या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ ते १७ ऑगस्टदरम्यान पडताळणी केली असता कोतवाल भानुदास बाभूळकर याने लाच मागितल्याचे समाेर आले. यावरून ३०० रुपयांची लाच घेताना अकोला एसीबीने आरोपी बाभूळकर यास मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत विभागाचे प्रमुख शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली आय. यू. चव्हाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.