आयुर्वेद महाविद्यालयात होणार कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:38 AM2020-09-08T10:38:22+5:302020-09-08T10:38:38+5:30
राधाकृष्ण तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयात कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वोपचार रुग्णालय व इतर कोविड सेंटरवरचा वाढता भार लक्षात घेता शहरातील राधाकृष्ण तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयात कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असून, या महाविद्यालयातील शंभर खाटांचे सेंटर अकोलेकरांच्या सेवेत सज्ज राहणार आहे.
अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता सध्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात लगतच्या जिल्ह्यातीलही रुग्ण दाखल होत असल्याने येथील व्यवस्थेवर ताण पडत आहे. कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आलेले दोन खासगी हॉस्पिटल, मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय, तालुकास्तरावरील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या केंद्रांवर भार वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सोमवारी राधाकिशन तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयास भेट देऊन तेथे उपलब्ध सुविधांची पाहणी केली. या ठिकाणी शंभर खाटा उपलब्ध आहेत. येत्या एक-दोन दिवसांत आयुर्वेद महाविद्यालयात कोविड सेंटर उभारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. १०० खाटांचे कोविड सेंटर उपलब्ध झाल्यास इतर केंद्रांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.