अन् डायलिसीसमुळे बचावले त्या कोविड रुग्णाचे प्राण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:51+5:302021-01-25T04:18:51+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत सर्वोपचार रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका ३५ वर्षीय कोविड रुग्णाला दाखल करण्यात आले होते. रुग्णाला आधिच ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत सर्वोपचार रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका ३५ वर्षीय कोविड रुग्णाला दाखल करण्यात आले होते. रुग्णाला आधिच किडनीचा आजार होता. त्यात निमोनिया आणि कोविडची भर पडल्याने रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर झाली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला कोविड आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला डायलिसीस सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने डॉक्टरांच्या हालचालीही सुरू झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर रुग्णाला डायलिसीस सुरू करण्यात आले; पण रुग्णाला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याने डॉक्टरही घाबरले; मात्र डॉक्टर आणि डायलिसीस तंत्रज्ञांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे रुग्णाचा जीव बचावला. डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. मालविया, अधिपरिचारिका रूपाली बनातकर आणि डायलिसीस तंत्रज्ञ रिता देशमुख यांच्या प्रयत्नांनी त्या रुग्णाचे प्राण बचावले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यावर कोविड आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
मागील नऊ महिन्यातील ही पहिलीच घटना
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक गंभीर रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार झाले; मात्र कोविडच्या उपचारावेळी डायलिसीसच्या गंभीर रुग्णावर उपचार करून त्याचे प्राण वाचविल्याची ही घटना मागील नऊ महिन्यात सर्वोपचार रुग्णालयात पहिल्यांदाच घडली.
संबंधित कोविड रुग्णाला आधिच किडनीचा आजार होता. त्यामुळे त्यावर कोरोनासोबतच किडनी विकाराचाही उपचार सुरू होता. रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ डायलिसीस सुरू करण्यात आले. सहकारी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने त्या रुग्णाचे प्राण बचावले.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसीन, जीएमसी, अकोला.