कोविड रुग्णांना दररोज लागतात एक हजार ऑक्सिजन सिलिंडर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:18 AM2021-04-02T04:18:18+5:302021-04-02T04:18:18+5:30
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढ आणि मृतकांचा आकडा पाहता, आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात गंभीर परिस्थिती ...
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढ आणि मृतकांचा आकडा पाहता, आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यंदा कोविडच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. मागील पंधरा दिवसांत ऑक्सिजनची मागणी दीड पटीने वाढली असून, दररोज सुमारे ९०० ते एक हजार ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हीच स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, मार्च महिन्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजनचा साठाही अपुरा ठरत आहे. सोमवारी जिल्ह्याला आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनावर नियंत्रणाची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
न्यूमोनियाच्या नावावर कोविड रुग्णांवर बेकायदेशीर उपचार
जिल्ह्यात अनेक कोविड रुग्णांवर केवळ सीटीस्कॅन अहवालाच्या आधारावर उपचार केले जात आहेत. या रुग्णांना न्यूमोनिया असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल केले जात असून, अशा रुग्णांसाठीही खासगी रुग्णालयात अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे.
सर्वोपचार रुग्णालयात ९ केएलचा टँकर दाखल
खासगी रुग्णालयात गरजेनुसार ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सर्वोपचार रुग्णालयात लावण्यात आलेल्या १० केएल ऑक्सिजन टँकमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँकसाठी ९ केएल क्षमतेचा टँकर आला आहे. त्यामुळे सध्यातरी सर्वोपचार रुग्णालयात मुबलक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.