वैद्यकीय अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून दिली कोविड लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 AM2021-04-05T04:17:11+5:302021-04-05T04:17:11+5:30
पारस : प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बुलबुले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास कोविड-१९ची लस ...
पारस : प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बुलबुले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास कोविड-१९ची लस दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभाग अकोला जिल्हाध्यक्ष अजय जाधव यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. तसेच संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनुसार, पारस येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील एका कर्मचाऱ्याचा कोरोना टेस्ट अहवाल दि. १६ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. केवळ दहा दिवसातच त्यांची पुन्हा टेस्ट केल्याची माहिती पारस प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिली. पारस प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बुलबुले यांनी दि.२४ मार्च रोजी फिटनेस सर्टिफिकेट दिले. तसेच वयाची पडताळणी न करता ४३ वर्षीय व्यक्तीस पदाचा गैरवापर करून प्राथमिक आरोग्य केंद्रातच दि.२५ मार्च रोजी कोविड-१९ची लस दिली. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी अजय जाधव यांनी तक्रारीत केली आहे.