कोविड योद्ध्यालाच नाकारला घरमालकाने प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:42 PM2020-06-21T12:42:04+5:302020-06-21T12:43:01+5:30
निगेटिव्ह आल्यानंतरही घरमालकाने घरात प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विरुद्ध लढत असताना डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी रात्रंदिवस झटत आहेत; मात्र त्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याच्या काही वाईट अनुभवांनाही या कोविड योद्ध्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच काहीसा वाईट अनुभव एका महिला डॉक्टरला आला असून, निगेटिव्ह आल्यानंतरही घरमालकाने घरात प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात नियमित डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय विद्यार्थीही विना मानधन गत दोन महिन्यांपासून रुग्णसेवा देत आहेत. हे वैद्यकीय विद्यार्थी स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करता संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेत आहेत. दरम्यान, काही डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचारी स्वत: देखील कोरोनाचे शिकार झाल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या सहकाºयांच्या संपर्कात आल्याने अनेकांनी कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या. त्यात एका महिला डॉक्टरचाही समावेश असून, तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. स्वॅब घेतल्याने ती महिला डॉक्टर काही दिवस सर्वोपचार रुग्णालयातील हॉस्टेलमध्येच राहिली होती; परंतु दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ती राहत्या घरी परतली, तेव्हा घरमालकाने तिला घरात प्रवेश नाकारल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. एका वैद्यकीय अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून,
त्या महिला डॉक्टरला घरात प्रवेश नाकारल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने न्याय मिळवून दिला; परंतु कोविड योद्ध्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अन् त्यांना मिळणारी वागणूक हा चिंतेचा विषय असून, समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
ते घरमालक स्वत: डॉक्टर!
कोविड योद्ध्यांना समाजातील विविध घटकांकडून वाईट अनुभव आले आहेत; मात्र चक्क एका डॉक्टरकडूनच असा अनुभव येणे धक्का देऊन जाणारा आहे. त्या महिला डॉक्टरचा घरमालक स्वत: डॉक्टर असल्याची माहिती आहे.
त्या डॉक्टरांना अद्यापही मानधन नाही
कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेण्यासोबतच रुग्णांची वैद्यकीय तपासणी करणारे हे आंतरवासीता डॉक्टर गत दोन ते अडीच महिन्यांपासून विना मानधन निरंतर रुग्णसेवा देत आहेत. मध्यंतरी त्यांना मानधन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु अद्यापही त्यांच्या मानधनाचा प्रश्न निकाली लागला नाही.