जीएमसीवर वाढताेय कोविडचा भार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:33+5:302021-03-13T04:34:33+5:30
अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील तीन कोविड वॉर्ड वाढविण्यात आले असले ...
अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील तीन कोविड वॉर्ड वाढविण्यात आले असले तरी गंभीर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अतिदक्षता विभागातील सर्व खाटा फुल्ल झाल्या आहेत दुसरीकडे रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील मनुष्यबळ कमी पडत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर पुन्हा कोविडचा भार वाढल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत सर्वोपचारच्या सहा वाॅर्डांमध्ये एकूण सुमारे १४० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १७ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यानंतर कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहावयास मिळाली. अशातच जानेवारीपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. मागील आठवडाभरात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने दिसू लागला. सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याने रुग्णालय प्रशासनाला तीन वॉर्ड वाढवावे लागले. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळ कमी पडू लागल्याने आरोग्य विभागाची चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांमध्ये कोरोनाबाधित आणि संदिग्ध रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ४५० खाटा आरक्षित करण्यात आल्या. यापैकी ३६८ खाटा सध्या भरल्या आहेत. ८२ खाटा शिल्लक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ३० खाटांचा कोरोना अतिदक्षता विभाग फुल्ल झाला आहे.
अकाेल्याला मिळाला अतिरिक्त लस साठा
कोविड लसीकरणात जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याने अकोला राज्यात चाैथ्या क्रमांकावर आहे. लसीकरणाचा वाढता वेग लक्षात घेता जिल्ह्याला अतिरिक्त लसींचा साठा मिळाला आहे.
अमरावती विभागासाठी काेव्हॅक्सीन या लसीचे ९७ हजार २८० डाेस मिळाले असून त्यामध्ये अकाेल्याला १९ हजार ६०० डाेस आहेत तर कोविशिल्ड या लसीचे २२ हजार डाेस मिळाले असल्याची माहिती औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिली.