हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केव्हीके सज्ज!
By Admin | Published: April 24, 2017 12:50 AM2017-04-24T00:50:03+5:302017-04-24T00:50:03+5:30
कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्थेचे संचालक डॉ. चारीआप्पा यांच्याशी बातचीत
अकोला: कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच भेडसावणाऱ्या हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) सज्ज झाली आहेत. याबाबत शेतकरी मेळावे, प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याची माहिती हैदराबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्थेचे संचालक डॉ. चारीआप्पा यांनी शनिवारी लोकमतशी बातचीत करताना दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे कृषी विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्राच्या दोन दिवसीय वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्यासाठी डॉ. चारीआप्पा येथे आले होते. याप्रसंगी त्यांनी केव्हीके राबवित असलेल्या विविध शेतीपयोगी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
प्रश्न- महाराष्ट्रात किती केव्हीके आहेत?
उत्तर- राज्यात ४४ केव्हीके असून, यातील विदर्भात १५ केव्हीकेंचा समावेश आहे. यामध्ये सात कृषी विद्यापीठांतर्गत, सात खासगी तर एक भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत नागपूरला आहे.
प्रश्न- केव्हीकेचे कार्य काय आहे?
उत्तर- कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान व शेतीपयोगी शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. संशोधित वाण, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेऊन त्याचा शेतकऱ्यांमध्ये प्रचार, प्रसार केला जातो. शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. यावर्षी या सर्व उपक्रमासह हवामान बदलाला सामोरे जाताना, याला अनुकूल पिके, संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.जलसंवर्धन, संरक्षित ओेलीत,यासंदर्भात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जात असून, पेरणी कशी करावी आदीवर खास लक्ष दिले जात आहे.
प्रश्न- येत्या खरीप हंगामासाठी केलेल्या उपाययोजन कोणत्या?
उत्तर- केव्हीकेचे काम तसे कृषी विद्यापीठे आणि शेतकरी यामध्ये समन्वय राखण्याचे आहे. तद्वतच शेतकऱ्यांसाठी आयसीएआर व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली जाते. जसे पंतप्रधान विमा योजनेचा प्रचार, प्रसार, मृदा अर्थात माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करणे व ते करू न देणे आदी कामे व खरिपासाठीच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.
प्रश्न- आदिवासी भागात केव्हीकेंनी कोणती कामे सुरू केली?
उत्तर- सर्वसामान्य शेतकऱ्यांसह आदिवासी भागातील शेतकऱ्यांना नवे शेती तंत्रज्ञान समजावून सांगण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद यासंर्भात गंभीर आहे. आदिवासी भागातील शेतीमध्ये अलीकडे यामुळे चांगले बदल दिसून येत आहेत.
प्रश्न- युवा शेतकऱ्यांसाठी कौशल्य विकासावर केव्हीके काम करीत आहे का?
उत्तर - युवा शेतकऱ्यांना शेतीचे अद्ययावत नवे तंत्रज्ञान अवगत व्हावे, याकरिता कौशल्य विकास कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. प्रक्रिया उद्योगाचे कमी कालावधीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी केव्हीकेचे प्रयत्न असतात. तसेच युवकांना रोजगार उपलब्ध करू न देण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे.
प्रश्न- केव्हीकेच्या कामाचा आढावा कसा घेता?
उत्तर- केव्हीकेना भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून अनुदान दिले जाते, त्यामुळे दरवर्षी केव्हीके करीत असलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. या मूल्यमापनाचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील दुर्गापूर केव्हीकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
प्रश्न- केव्हीकेचे नियंत्रण कुठून होते?
उत्तर- भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून केव्हीकेला शंभर टक्के निधी उपलब्ध करू न दिला जातो. केव्हीकेचे विभागीय कार्यालय यावर्षी पुण्याला देण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्याचे काम बघितले जाते.