साथरोगांचा उद्रेक अन् हिवताप अधिका-यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडे!
By admin | Published: November 6, 2014 11:07 PM2014-11-06T23:07:23+5:302014-11-06T23:35:16+5:30
अकोला, वाशिम, बुलडाण्यातील स्थिती.
सचिन राऊत/अकोला
राज्यातील बहुतांश शहरांमध्ये डेंग्यूचे थैमान व जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा उद्रेक झाला असून, त्यावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा हिवताप अधिकार्यांच्या कार्यालयांचा कारभार मात्र प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडून चालविल्या जात आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीनही जिल्हय़ातील जिल्हा हिवताप अधिकार्यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडे आहे. विशेष म्हणजे बुलडाण्यात साहाय्यक हिवताप अधिकारी कार्यरत असतानाही, जिल्हा हिवताप अधिकार्यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञाकडे असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला शहरासह संपूर्ण जिल्हय़ात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून, दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १३ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. वाशिम व बुलडाण्यातही डेंग्यूने थैमान घातले असून, जलजन्य आजारांचाही उद्रेक झाला आहे. अशा परिस्थितीत तीनही जिल्ह्यांमध्ये जिल्हा हिवताप अधिकार्यांचा प्रभार प्रयोगशाळा तंत्रज्ञांकडे देण्यात आला आहे. जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा कारभार प्रभारींकडून चालविण्यात येत असून, साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकार्यांची पदेही रिक्त आहेत.
अकोला व वाशिम जिल्ह्यांमध्ये साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी नसून, बुलडाण्यात साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी कार्यरत असतानाही, प्रयोगशाळा तंत्रज्ञाकडे जिल्हा हिवताप अधिकार्यांचा प्रभार आहे. गत दोन वर्षांपासून अकोल्यात जिल्हा हिवताप अधिकारी हे पद रिक्त आहे. साथरोगांचा प्रचंड उद्रेक झाला असताना, हिवताप विभागाकडून काही जिल्हा हिवताप अधिकार्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत; मात्र अकोल्यासह वाशिम व बुलडाण्यात प्रभारींच्या खांद्यावरून हा कारभार चालविण्यात येत असून, डेंग्यूच्या उच्चाटनासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना झाल्या नसतानाही, त्यांना नोटीस बजाविण्याकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे.
* अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे साथरोगांचा उद्रेक!
साथरोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप अधिकारी, साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कीटक अधिकारी, कीटक संग्राहक असणे आवश्यक आह; मात्र हा विभाग केवळ प्रयोगशाळा तंत्रज्ञांमार्फत चालविण्यात येत असल्याने साथरोगांवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. काही जिल्हय़ात केवळ अधिकार्यांच्या किरकोळ दुर्लक्षामुळे साथरोगांचा उद्रेक झाला असल्याची माहिती आहे.