अकोल्यात १७ लाखांची रोकड लुटली
By Admin | Published: September 13, 2014 11:26 PM2014-09-13T23:26:00+5:302014-09-13T23:26:00+5:30
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ चोरट्यांचा प्रताप.
अकोला : दुचाकीला धक्का लागल्याचे कारण पुढे करुन चालकाला मारहाण केल्यानंतर कारमधील १७ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली.
पारस येथील सरपंच संतोष श्रीराम दांदळे यांनी शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमधून १७ लाख रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम एका परिचित प्रतिष्ठानमध्ये ठेवून बाजारपेठेतून किराणा व इतर साहित्य खरेदी केले. किराणा व साहित्य आणि १७ लाख रुपयांची रोकड त्यांनी इनोव्हा कारमध्ये ठेवून चालक दिलीप बोचरे याला निवासस्थानी घेऊन जाण्यास सांगितले. दरम्यान, कार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कारचा धक्का लागल्याचे कारण समोर करून कार अडविली. त्यानंतर चालकाला बाहेर बोलावून दुचाकीवरील एकाने मारहाण केली तर दुसर्याने कारमधील १७ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली.
** रुईच्या गाठीची रकम!
संतोष दांदळे व गजानन दांदळे यांची जिनिंग व प्रेसिंग असून, रुईच्या गाठीची ही रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. रुईच्या गाठीची ही १७ लाख रुपयांची रक्कम काढून ते घराकडे निघाले होते. मात्र चोरट्यांनी त्यांच्या मागावर राहून ही रक्कम लंपास केल्याचे सूत्रांनी सांगितले.