सर्वोपचार रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:00 PM2019-07-15T14:00:37+5:302019-07-15T14:00:42+5:30
अस्वच्छता आणि सांडपाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती आणि अस्वच्छतेमुळे वाढलेल्या माशांची संख्या साथरोग पसरविण्यास हातभार लावत असल्याचे वास्तव आहे; मात्र याकडे आरोग्य यंत्रणेचेच दुर्लक्ष होत आहे.
अकोला : सध्या वातावरणातील बदलांमुळे कीटकजन्य आजारांसह साथरोगाचाही धोका कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आणि सांडपाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती आणि अस्वच्छतेमुळे वाढलेल्या माशांची संख्या साथरोग पसरविण्यास हातभार लावत असल्याचे वास्तव आहे; मात्र याकडे आरोग्य यंत्रणेचेच दुर्लक्ष होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये काही वॉर्ड परिसरात पाणी साचून आहे, तर येथील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छतादेखील करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या पाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती रुग्णांसाठी घातक ठरत आहे. डासांसोबतच अस्वच्छतेमुळे निर्माण झालेल्या माशांमुळे साथरोगाचाही धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रावर आहे. साठविलेल्या पाण्यासह वॉर्ड परिसरात साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे डासांची व माशांची उत्पत्ती वाढली असून, त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार सर्वांच्या निदर्शनास येत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
...तर कडक कारवाई हवी!
बहुतांश लोक रुग्णालय परिसरात शिळे अन्न किंवा इतर कचरा टाकून मोकळे होतात; परंतु त्यापासून होणाºया आजारांचा विचार करीत नाहीत. कचरा टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर वॉच ठेवण्याची गरज आहे. कुठेही अस्वच्छता पसरविल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
‘डस्टबिन’ची संख्या वाढविण्याची गरज!
सर्वोपचार रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात डस्टबिन आहेत; मात्र बहुतांश लोक उघड्यावरच कचरा किंवा शिळे अन्न टाकून मोकळे होतात. ही बाब लक्षात घेता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होते, अशा ठिकाणी डस्टबिनची संख्या वाढविण्याची गरज आहे.
रिक्त पदांमुळे प्रशासन हतबल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीची पदे रिक्त असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम स्वच्छतेवर होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे.