‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा कायमच; रुग्णांची चिठ्ठीवर बोळवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:42 PM2018-10-07T12:42:56+5:302018-10-07T12:46:44+5:30

गत वर्षभरापासून असलेला औषधांचा तुटवडा अजूनही कायमच असून, बाह्य उपचार कक्षात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना सर्रास चिठ्ठ्या लिहून बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

lack of medicines in GMC akola | ‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा कायमच; रुग्णांची चिठ्ठीवर बोळवण 

‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा कायमच; रुग्णांची चिठ्ठीवर बोळवण 

Next
ठळक मुद्दे स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांनी धुमाकूळ घातल्याने सर्वोपचारमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. औषधांचा साठा कमी असल्याने अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जात आहे.रुग्णालय प्रशासनाकडे फक्त ३ कोटी ८७ लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत.

अकोला : शहरासह जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेल्या औषधांच्या तुटवड्याचे ग्रहण सुटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. गत वर्षभरापासून असलेला औषधांचा तुटवडा अजूनही कायमच असून, बाह्य उपचार कक्षात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना सर्रास चिठ्ठ्या लिहून बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे गरीब रुग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सर्वोपचार रुग्णालयात संपूर्ण अकोला जिल्हा, लगतचा वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून रुग्ण उपचारासाठी येतात. येथील ओपीडीमध्ये दिवसाकाठी किमान १२०० ते १४०० रुग्णांची नोंद होते. आंतररुग्ण विभागातील विविध वॉर्डांमध्येही मोठ्या संख्येने रुग्ण भरती आहेत. सध्या डेंग्यू, स्क्रब टायफस या कीटकजन्य व स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांनी धुमाकूळ घातल्याने सर्वोपचारमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. येथे येणाºया रुग्णांच्या तुलनेत औषधांचा साठा कमी असल्याने अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जात आहे.

आठ कोटींपैकी निम्माच निधी मिळाला!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधे व साहित्य खरेदी तसेच इतर बाबींसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाठपुरावा करून मागच्या महिन्यात आठ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यापैकी रुग्णालय प्रशासनाकडे फक्त ३ कोटी ८७ लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. यामधून औषध पुरवठादारांची जुनी देयके देण्यात आली आहेत.

दोन आठवड्यात परिस्थिती सुधारेल!
शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर औषधांची खरेदी होऊन परिस्थिती सुधारेल, असे वाटले होते; परंतु निधी मिळून तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना छेडले असता, येत्या दोन ते तीन आठवड्यात औषध पुरवठ्याची स्थिती सुधारेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

Web Title: lack of medicines in GMC akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.