अकोला ‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा; प्रशासनावर उधार-उसनवारीची नामुष्की
By Atul.jaiswal | Published: January 24, 2018 01:33 PM2018-01-24T13:33:52+5:302018-01-24T14:49:33+5:30
अकोला: गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासनावर ओढवली आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासनावर ओढवली आहे. रुग्णांची औषधांची गरज भागविण्यासाठी गत काही दिवसांपासून चक्क जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व उपसंचालक, आरोग्यसेवा यांच्याकडून उधार-उसनवारीवर औषधे घेतल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘सर्वोपचार’ रुग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज हजारोंच्या संख्येने येणाºया रुग्णांच्या तुलनेत सर्वोपचारमधील सुविधा कमी पडत आहेत. रुग्णालयात बाह्य उपचार विभाग (ओपीडी)मध्ये येणाºया तसेच आंतररुग्ण विभागात भरती असलेल्या रुग्णांना रुग्णालयातूनच औषधे दिली जातात. त्यासाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून औषधांची खरेदी केली जाते. सर्वोपचार रुग्णालयास औषध पुरवठा करणाºया विविध संस्थांची तब्बल साडेआठ कोटी रुपयांची देयके जानेवारी २०१७ पासून थकीत आहेत. त्यामुळे या संस्थांनी आता औषधांचा पुरवठा करण्यात आखडता हात घेतला आहे. परिणामी, रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची केवळ तपासणी करणे, एवढेच काम सुरू आहे. आवश्यक औषध बाहेरून विकत आणण्यासाठीचे ‘प्रिस्क्रिप्शन’ डॉक्टरांकडून दिले जात आहे. खोकला, ताप यासारख्या आजारांचीही औषधे नसल्यामुळे रुग्णसेवा बाधित होत असल्याचे चित्र आहे.
‘पीएलए’मधून अदा केली जातात ४० लाखांची बिले
निधीअभावी रुग्णांचा औषध पुरवठा व इतर साहित्याचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी रुग्णालयाच्या स्वीय प्रपंची खात्यामधून (पीएलए) देयके अदा करण्याची परवानगी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या सहसंचालकांनी राज्यभरातील रुग्णालयांनी दिली आहे. त्यानुषंगाने रुग्णालय प्रशासनाकडून दर महिन्याला ४० लाख रुपयांची बिले अदा केली जातात. यामध्ये आॅक्सिजन, इलेक्ट्रिक, सुरक्षारक्षक पुरविणाºया संस्था व औषध पुरवठा करणाºया संस्थांची देयके अदा केली जातात.
खोकल्याचेही औषध मिळेना
रुग्णालयातील प्रतिजैवक औषधांचा साठा संपला आहे. खोकला, ताप, पोटदुखी यांसारख्या आजारांचीही औषधे मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागात येणाºया रुग्णांना चिठ्ठ्या लिहून दिल्या जात आहेत. साध्या खोकल्याचेही औषध मिळत नसल्याने रुग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
७० पेक्षा अधिक औषधे उपलब्ध नाहीत
अॅझिथ्रोमायसीन, डायक्लोफेनॅक, पॅरासिटामॉल, अॅन्टासिड, अॅमॉक्सिलिन, अॅल्बेन्डोझोल, सॉर्बिट्रेट, डॉक्सिक्लाईन, झिप्रोफ्लॉक्सिन, रॅन्टिडीन, ईरिथ्रोमायसिन, नॉरफ्लॉक्स आदी जवळवास ७० पेक्षा अधिक औषधे रुग्णालयाच्या भांडारत उपलब्ध नसल्याची माहिती आहे.
भारिप-बमसंचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना निवेदन
सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने तातडीने औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी भारिप-बमसंच्यावतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी पराग गवई, सतीश सिरसाट, संजय सदांशिव, रवी पाटील, दीपक तायडे, संतोष अलाट, अरुण बलखंडे, सतीश वानखडे, राहुल इंगळे, निखिल वानखडे, विशाल वाघ, भूषण खंडारे, नितीन डोंगरे, सुमोद पाटील, भाऊसाहेब अंभोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.