ऑक्सिजनअभावी सोमवारची रात्र ठरली गोंधळाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:36 AM2021-03-31T10:36:36+5:302021-03-31T10:37:06+5:30
Akola Private Hospitals ऑक्सिजनचा टँकर आलाच नसल्याने सोमवारीची रात्र जिल्ह्यातील खासगी रुग्णांलयांसाठी गोंधळाची ठरली.
अकोला : कोविडच्या वाढत्या रुग्णंख्येसोबतच ऑक्सिजनची गरजही वाढली आहे, मात्र सोमवारी येणारा ऑक्सिजनचा टँकर आलाच नसल्याने सोमवारीची रात्र जिल्ह्यातील खासगी रुग्णांलयांसाठी गोंधळाची ठरली. रात्रभर पुरेल येवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती बाहेर आल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकही धास्तावले होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने केलेल्या हालचालीमुळे मंगळवारी सकाळी ऑक्सिजनची उपलब्धता झाली. त्यामुळे परिस्थितीत नियंत्रणात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, आतापर्यंतची सर्वाधिक गंभीर परिस्थितीत मार्च महिन्यात दिसून येत आहे. गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या आनुषंगाने खासगी कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेने ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. त्यामुळे दर दोन दिवसांतून एकदा पुणे जिल्ह्यातील चाकण येथून १० ते १५ किलो लिटर क्षमतेच्या टँकरची मागणी केली जाते. मागणीनुसार, सोमवारी ऑक्सिजनचा एक टँकर येणे अपेक्षित होते, मात्र हा टँकर न झाल्याने सोमवारी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची मोठी पंचाईत झाली. रात्रभर पुरेल येवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याच्या चर्चेमुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईकही धास्तावले होते. रात्री उशीरा जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्यानंतर जिल्ह्याला ऑक्सिजन उपलब्ध झाले अन् रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सुटकेचा श्वास घेतला. ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने मंगळवारी परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
रुग्णांकडूनच घेतल्या स्वाक्षऱ्या
आज रात्री १२ वाजतापर्यंत पुरेल येवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित व्हा किंवा स्वत: ऑक्सिजनची व्यवस्था करा, अशा मजकुराच्या पत्रावर सोमवारी रात्री रुग्णांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार शहरातील एका खासगी कोविड केअर सेंटरमध्ये घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. या प्रकारामुळे रुग्णांमध्ये धडकी भरली होती, मात्र सुदैवाने रात्री उशीरा ऑक्सिजनची उपलब्धता झाल्याने या रुग्णांचे प्राण बचावले. अन्यथा ऑक्सिजनअभावी या रुग्णांना जीव गमवावा लागला असता.
ऑक्सिजन टँकचा जीएमसीला मोठा आधार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँक गत काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आला. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालायतील रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. या टँकची क्षमता १० कीलोलिटर येवढी आहे.
पुणे जिल्ह्यातील चाकण येथून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ऑक्सिजनचा टँकरला नव्हता, परंतु जिल्हा प्रशासनाने तसेच उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या प्रयत्नानंतर ऑक्सिजनची समस्या निकाली लागली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
- डॉ. स्वप्नील ठाकरे, ऑक्सिजन पुरवठादार, अकोला