शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अद्यापही नियोजनाचा अभाव !
By admin | Published: January 4, 2016 02:39 AM2016-01-04T02:39:11+5:302016-01-04T02:39:11+5:30
अमरावती विभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ‘सी’ ग्रेडमध्ये.
अकोला : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीत विभागातील निकाल 'सी' ग्रेडमध्ये लागला. त्यामुळे अमरावती विभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सर्वांसमोर आली असली, तरी ही गुणवत्ता सुधारण्यासाठी विभाग स्तरावर अद्यापही नियोजन करण्यात आले नाही. परिणामी या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राज्यातील अप्रगत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी चालू शैक्षणिक सत्रामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची प्रथम भाषा आणि गणित या विषयावर पायाभूत चाचणी घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये विदर्भाला ह्यसीह्ण ग्रेड मिळाला. या धक्कादायक निकालाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता समोर आली. या निकालानंतर अप्रगत ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, जिल्ह्यात अशा प्रकारचे नियोजन न करण्यात आल्याचे दिसून येते. वर्षभरात विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने तीन चाचण्यांचे नियोजन केले होते. परंतु, यापैकी डिसेंबर महिन्यातील दुसरी चाचणी रद्द केल्याने आता थेट अंतिम चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची पावती आता शैक्षणिक सत्राअखेरीस निदर्शनास येईल. त्या अनुषंगाने या कालावधीत विद्यार्थ्यांंचे गुणवत्ता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमांवर बंदी
प्रगत शैक्षणिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या अनुषंगाने शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा, डायट व राज्यस्तरीय संस्थांमधील लोकांना मागणी शिवाय प्रशिक्षण देण्यास बंदी आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंध नसणार्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र २0१६-१७ मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची उद्दिष्ट विचारात घेऊन त्याच्याशी सुसंगत अंदाजपत्रक व कार्ययोजना तयार करावी लागणार आहे.