अकोटात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:10+5:302020-12-17T04:44:10+5:30
अकोट : शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. तसेच शहरात आठवडी बाजारात आसपासच्या खेड्यांतील ...
अकोट : शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. तसेच शहरात आठवडी बाजारात आसपासच्या खेड्यांतील ग्रामस्थांसह महिला मोठ्या संख्येने येतात. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिकांसह महिलांची अडचण होत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
अकोट बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे
अकोट : येथील बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे असल्याने एसटी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहकचालकांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात
पिंजर: गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर, हरभरा पिकावर परिणाम होत आहे. ढगाळ वातावरणात तुरीचा फुलोरा गळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. तसेच अळ्यांचा प्रादुर्भावसुद्धा वाढत आहे. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात
बाळापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद पडल्यामुळे रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे तसेच कायम सोडून दिल्यामुळे अपघात वाढले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ढे बुजविण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
दहिहांडा : दहिहांडा ते दहिहांडा फाटापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील गिट्टी व डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
बाळापूर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य
बाळापूर : शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नियमित स्वच्छता होत नाही. नाल्या तुंबल्या आहेत. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. गावात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पथदिवे बंद; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
निहिदा: गावातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे अंधार पसरला आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासकाने गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे पिकांचे नुकसान
चौहोट्टा बाजार : अकोला ते अकोट राज्यमार्गाचे काम रखडले असून, कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवल्यामुळे धूळ साचली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ लगतच्या शेतांमधील पिकांवर उडत आहे. त्यामुळे कपाशी, तूर व हरभरा आदी पिकांचे नुकसान होत आहे.
पीकविम्यापासून शेतकरी वंचित
हातरुण : शेतकऱ्यांनी गतवर्षी पिकांचा विमा काढला. यंदासुद्धा मूग, उडीद, सोयाबीन आणि कपाशी पिकांचा विमा काढला. अतिवृष्टीमुळे यंदा मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे मोेठे नुकसान झाले. परंतु, अद्यापपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नाही.
नाल्या तुंबल्या, डासांचा प्रादुर्भाव वाढला
कुरूम : गावात अस्वच्छता आहे. नाल्या तुंबल्या असून, ठिकठिकाणी कचरा साचला आहे. नाल्यांमधील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
पातूर : तालुक्यातील गावांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक होत आहेे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये बसविण्यात येत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.