अवकाळी पावसाने वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान
By admin | Published: March 15, 2015 01:29 AM2015-03-15T01:29:01+5:302015-03-15T01:29:01+5:30
विटांचा कच्चा माल भिजला; स्वामीत्वधनाची रक्कम माफ करण्याची मागणी.
चोहोट्टा बाजार (अकोला): शुक्रवार, १३ मार्च रोजी रात्री चोहोट्टा बाजार परिसरात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांसह येथील वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीट उत्पादक पुन्हा संकटात सापडले आहेत.
चोहोट्टा बाजार परिसरात सुमारे ३00 वीटभट्टय़ा आहेत. यावर्षी येथील वीट उत्पादकांनी लाखो रुपये खर्च करून भुसा, राख, भसवा व इतर साहित्याची खरेदी करून वीट निर्मिती सुरू केली. मजुरांनी विटांचा कच्चा माल तयार करून ठेवला. परंतु, यापूर्वी आलेल्या पावसाने अशा विटांच्या कच्च्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते. त्यानंतरही परिसरातील वीट उत्पादकांनी ती नुकसानी सोसूनही पुन्हा विटांचा कच्चा माल तयार केला होता. परंतु, शुक्रवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने विटांचा कच्चा माल भिजून वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. यामुळे महसूल विभागाच्यावतीने वसूल करण्यात येणारी स्वामित्वधनाची (रॉयल्टी) रक्कम भरावी तरी कशी, या चिंतेने वीट उत्पादक हवालदिल झाले आहेत.
शासनाने वीट उत्पादकांकडून वसूल केली जाणारी स्वामित्वधनाची रक्कम माफ करावी, अशी मागणी वीट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र एखे तसेच बंडू राठी व अन्य वीट उत्पादकांनी त्यांच्या संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे