मूर्तिजापूर शहरातील शॉपिंग सेंटरमध्ये शौचालयाचा अभाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:22+5:302021-01-16T04:22:22+5:30
मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेचे १७ शॉपिंग सेंटर असून, भाडेकरू दुकानदारांकडून दरमहा नगर परिषदेमार्फत भाडेवसुली करण्यात येत आहे; मात्र ...
मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेचे १७ शॉपिंग सेंटर असून, भाडेकरू दुकानदारांकडून दरमहा नगर परिषदेमार्फत भाडेवसुली करण्यात येत आहे; मात्र या शॉपिंग सेंटरमध्ये सुविधा नसल्याने ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील शॉपिंग सेंटरमध्ये शौचालयाचा अभाव असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाॅपिंग सेंटरमध्ये शौचालय उभारण्याची मागणी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
शहरात नगर परिषदेचे १७ शाँपिंग सेंटर आहेत. जवळपास ५०० दुकानदार असून, ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. नगर परिषदेमार्फत दरमहा भाडे वसूल करण्यात येते; मात्र या शॉपिंग सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. शॉपिंग सेंटरमध्ये शौचालयाची निर्मिती केली नसल्याने दुकानदारांची गैरसोय होत आहे. शौचालयाचा अभाव असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे नगर परीषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. १७ शॉपिंग सेंटरपैकी चार ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे. नगर परिषदेला दरमहा तीन लक्ष रुपये दुकान भाडे मिळत आहे; मात्र सुविधा उपलब्ध करून देण्यास न.प.असमर्थ ठरत आहे. नगर परिषदेने शॉपिंग सेंटरमध्ये शौचालयाची निर्माण करावी, अशी मागणी करीत नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.