अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी सुतळीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:08 PM2019-11-09T12:08:54+5:302019-11-09T12:08:58+5:30
अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी ५ कोटी ८५ लाख ५४ हजार रुपयांच्या खरेदीला मान्यता दिली आहे.
अकोला: निसर्गाच्या अवकृपेने राज्यातील बळीराजा हवालदिल झाला असतानाच शासकीय धान्य गोदामांमध्ये जमा होणाऱ्या अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी सुतळीचा अभाव असल्यामुळे शासकीय यंत्रणांची कार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे. परतीच्या पावसाने शेतमालाची पुरती नासाडी झाली असून, कसेबसे शिल्लक राहिलेले पीक वाचविताना शेतकरी धावपळ करीत आहेत. अशा स्थितीत उशिरा का होईना, अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी ५ कोटी ८५ लाख ५४ हजार रुपयांच्या खरेदीला मान्यता दिली आहे.
राज्यभरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी यंदा शेती उत्पादनात वाढ होईल, अशी पिकांची स्थिती होती. यामध्ये ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, भात, धानाचे भरघोस उत्पादन होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान होते. साहजिकच, दिवाळीपूर्वी पिकांची उत्तम स्थिती असल्याने पीक उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात असला तरीही राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी सुतळीचा अभाव कसा, असा प्रश्न निर्माण होतो. यादरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाने पोती शिवण्यासाठी आवश्यक सुतळीच्या खरेदीसाठी आॅनलाइन प्रणालीद्वारे ई-निविदा प्रकाशित केली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५ कोटी ८५ लाख ५४ हजार रुपयांतून सुतळीच्या गाठी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२ लाख ७६ हजार किलोची होणार खरेदी
राज्यातील काही शासकीय गोदामांमध्ये मशीनद्वारे पोते शिवले जातात, तर ज्या गोदामांमध्ये वीज उपलब्ध नाही, त्याठिकाणी सुतळीद्वारे पोती शिवतात. त्यासाठी २ लाख ७६ हजार १९९ किलो म्हणजेच ५ लाख ५२ हजार ३९८ युनिट्स सुतळीच्या गाठींची खरेदी केली जाईल.