लाखावर गॅस ग्राहक ‘सबसिडी’पासून वंचित
By admin | Published: March 15, 2015 01:26 AM2015-03-15T01:26:45+5:302015-03-15T01:26:45+5:30
अकोला जिल्ह्यात १.३९ लाख ग्राहकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित.
संतोष येलकर /अकोला : गॅस सबसिडी ची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना गेल्या जानेवारीपासून सुरू करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ४९२ गॅस सिलिंडर ग्राहकांपैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ १ लाख ३९ हजार २२४ ग्राहकांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात १ लाख ३ हजार २६८ ग्राहक गॅस ह्यसबसिडीह्णच्या लाभापासून वंचित आहेत.
गॅस सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खाते क्रमांकावर जमा करण्याची योजना गत १ जानेवारीपासून केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये गॅस सिलिंडर ग्राहकांनी वितरकांकडे एका सिलिंडरचे ६६२ रुपये जमा करून, सिलिंडर घेतल्यानंतर संबंधित गॅस सिलिंडर ग्राहकांच्या बँक खाते क्रमांकावर १९८ रुपयांच्या सबसिडीची रक्कम जमा केली जाते. या योजनेत गॅस सिलिंडर ग्राहकांचा ग्राहक क्रमांक आधारकार्ड क्रमांक तसेच बँक खाते क्रमांकाशी संलग्नित असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात इंडेन, हिंदुस्थान व भारत या तीनही गॅस कंपन्यांचे एकूण २ लाख ४२ हजार ४९२ गॅस ग्राहक आहेत. त्यापैकी २७ फेब्रुवारीपर्यंत १ लाख ६७ हजार ४७९ गॅस ग्राहकांचा ग्राहक क्रमांक आधारकार्ड क्रमांकाशी संलग्नित करण्यात आला असून, त्यापैकी १ लाख ३९ हजार २२४ गॅस ग्राहक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित करण्यात आले. उर्वरित १ लाख ३ हजार २६८ गॅस ग्राहकांचे ग्राहक क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित करण्याचे काम अद्यापही बाकी आहे. त्यामुळे ग्राहक क्रमांक आणि आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी संलग्नित न करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाखांवर गॅस सिलिंडर ग्राहकांना गॅस सबसिडीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.