दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर!
By Admin | Published: June 18, 2017 02:03 AM2017-06-18T02:03:22+5:302017-06-18T02:03:22+5:30
बोरगाव मंजू येथे दारूचे दुकान फोडले: पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : गावात नव्याने सुरू होत असलेले दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी गावातील महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. पोलीस स्टेशननंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला होता. तेथे महिलांनी ठिय्या आंदोलन केले, तसेच दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली.
रामजी नगर, सिद्धार्थ नगर, लक्ष्मी नगर आदींसह शहरात, वस्तीमध्ये नव्याने स्थानांतरित देशी दारूसह वाइन बार, बीअर शॉपी सुरू करू नये, या मागणीसाठी शनिवारी सकाळी १0 वाजता बसथांब्यावर सोपीनाथ महाराज सभागृहात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत या निर्णयाचा निषेध करून गाव दारूमुक्त करण्याचा ग्रामस्थांसह महिलांनी निर्धार केला व घोषणा देत मुख्य मार्गाने मोर्चा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन संपूर्ण गाव दारूमुक्त करावे, नव्याने स्थानांतरित देशी दारूच्या दुकानांना कायमचा आळा घालावा, आदी मागण्यांचे एक निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर यांना दिले. ग्रामस्थांसह महिलांनी शासन व प्रशासनविरोधी रोष व्यक्त केला.
यावेळी घोषणा देऊन जोपर्यंंत देशी दारूची, वाइन बार, बीअर शॉपी दुकाने बंद होणार नाहीत, जोपर्यंंत गावात दारूबंदी होणार नाही, तोपर्यंंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिला संघर्ष समिती, संत गजानन महाराज सेवा समितीसह ग्रामस्थांनी यावेळी केला.
दरम्यान, आजचा मोर्चा, रास्ता रोको आक्रमक न होता शासनाने या समाजहित प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन करून सभेला सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे, डॉ. केशव काळे, नरेंद्र निवाणे, विकास पल्हाडे, रामराव चोटमल, सखाराम वानखडे, भाऊराव वानखडे, दयाराम इंगळे यांच्यासह महिला समिती अध्यक्ष गुंफाबाई वानखडे आदींनी मार्गदर्शन केले.