चर्चा दोन आमदारांच्या उमेदवारीचीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:17 PM2019-06-29T12:17:59+5:302019-06-29T12:18:12+5:30
दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार असल्याने वाटाघाटीत यापैकी एक जागा जरी सेनेला मिळाली तर विद्यमान आमदारांच्या उमेदवारीचे काय, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: भाजपा-शिवसेना उमेदवारीचे आता फायनल ‘ठरलंय’ असेच संकेत राज्य स्तरावरील घडामोडींवरून मिळत आहेत. त्यामुळे युती झाल्यास कोणत्या पक्षाला कोणत्या जागा, याची चर्चा सुरू झाली असून, त्याला अकोलाही अपवाद नाही. अकोल्यात मात्र शिवसेनेच्या दोन जागांच्या दावेदारीला भाजपाने जिंकलेल्या जागांचा अडसर आहे. सेनेला बाळापूर हवा आहे. त्यासोबतच उरलेल्या चार मतदारसंघांपैकी अकोट किंवा मूर्तिजापूर यापैकी एक जागा सेनेलाच मिळावी, असा आग्रह पक्षाकडून धरला जात आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार असल्याने वाटाघाटीत यापैकी एक जागा जरी सेनेला मिळाली तर विद्यमान आमदारांच्या उमेदवारीचे काय, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे.
अकोल्यातील अकोट व बाळापूर हे सध्या सर्वाधिक चर्चेचे मतदारसंघ आहेत. अकोटची जागा २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकली होती. २०१४ ला शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढल्यावर सेनेला हा मतदारसंघ टिकविता आला नाही व भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवित स्थानिक नेतृत्वाला मोठी चपराक दिली. आ. भारसाकळे हे ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांना पंचायत राज समितीचे अध्यक्षपदही दिले; मात्र ते दर्यापूरचे आहेत, स्थानिक नाहीत, असा प्रचार अलीकडच्या काळात जोरात सुरू झाला आहे. भाजपामधील कार्यकर्त्यांचा एक गटही त्यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे भांडवल शिवसेनेकडून केल्या जात आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कापून ही जागा सेनेला कशी मिळेल, असा प्रयत्न सेनेकडून जोरकसपणे केला जात असल्याचे चित्र अकोट मतदारसंघात आहे. दुसरीकडे आ. भारसाकळे यांचे पक्षात वरिष्ठ पातळीवर चांगलेच वजन असून, नेत्यांशी असलेले संबंधही सौहार्दपूर्ण असल्याने सेनेसाठी त्यांचा मतदारसंघ मिळविणे हे आव्हानच ठरणार आहे.
या मतदारसंघासोबतच मूर्तिजापूर मतदारसंघाचीही चर्चा सेनेच्या वर्तुळात जोरात आहे. आ. हरीश पिंपळे नेतृत्व करीत असलेल्या या राखीव मतदारसंघात शिवसेनेने चांगलीच बांधणी केली आहे, तर दुसरीकडे आ.पिंपळे याच्या समोर भाजपानेही पक्षांतर्गत आव्हान उभे करून नव्या नेतृत्वाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. अकोल्यातील खासदार व नामदार अशा दोन्ही गटांसोबत जुळवून घेण्याचा पिंपळे यांचा प्रयत्न असला तरी त्यांच्या विरोधात यावेळी एन्टी इन्कम्बन्सी असल्याचा प्रचार होत आहे. नेमका याचाच फायदा सेनेकडून उचलला जात आहे. ही जागा शिवसेनेला मिळाली तर सेना पूर्ण ताकदीने ही जागा जिंकेल अशी ग्वाही थेट मातोश्रीपर्यंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहचविली आहे. पिंपळे हे सलग दुसऱ्यांदा आमदार असून, त्यांना विधिमंडळ समितीचे अध्यक्षपदही देण्यात आले आहे. त्यामुळे ही जागा भाजपा सहजासहजी सोडण्याची शक्यता कमीच आहे.
या पृष्ठभूमीचा विचार केला तर भाजपाला बाळापूर हा मतदारसंघ सेनेला सोडणे सहज शक्य आहे; मात्र अकोट व मूर्तिजापूर हे विधानसभा मतदारसंघासाठी मोठी कसरत होणार आहे. या दोन्ही आमदारांची क्षमता व वरिष्ठ नेत्यांसोबत असलेले संबंध पाहता यांची उमेदवारी कापण्याचे मोठे आव्हान पक्षासमोरही राहणार असल्याने सेनेच्या पदरी निराशाही पडण्याची शक्यता आहे. या सोबतच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडते, यावरही या दोन मतदारसंघाचे भविष्य अवलंबून राहणार आहे. सध्या तरी केवळ जर-तरच्या स्वरूपात चर्चा सुरू असून, त्यामुळेच राजकारण तापत आहे.