आकोट येथे तलाठय़ास दोन हजाराची लाच घेताना पकडले!
By admin | Published: October 15, 2016 03:24 AM2016-10-15T03:24:52+5:302016-10-15T03:24:52+5:30
शेतक-याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठयास रंगेहात पकडले.
आकोट, दि. १४- शेतामधील पोटखराबीचे क्षेत्रफळ दुरुस्त करून देण्याकरिता तक्रारदार शेतकर्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी संदीप विठ्ठल ढोक यास अकोला अँन्टी करप्शन ब्यूरोने रंगेहात पकडले. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली.
तक्रारदार याने आपल्या शेतामध्ये पोटखराबी नाही व आधीच्या सात-बारामध्ये पोटखराबी दाखविली नाही. नंतर मात्र सेतूमधून सात-बारा काढला असता पोटखराबी दाखविण्यात आली. याबाबत तहसीलदार आकोट यांना सात-बारावरील क्षेत्र दुरुस्ती करून पोटखराबी काढून टाकण्याबाबत विनंती अर्ज दिला होता; परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार असल्याचे तहसीलदार यांना ७ ते ८ दिवस आधी कळविले असता, कुटासा येथील तलाठी संदीप ढोक यांनी २0 दिवसांत कार्यवाही करतो, असे लेखी दिले; परंतु कार्यवाही केली नाही. उलट सात-बारामधील दुरुस्ती करून पोटखराबीचे क्षेत्रफळ काढून टाकण्याकरिता पाच हजर रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारकर्त्याने अकोला येथे अँन्टी करप्शन ब्यूरोच्या कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदविली. लाचेची मागणी केल्यामुळे सापळा रचून १४ ऑक्टोबर रोजी दुपारी आकोट येथील एका हॉटेलवर तडजोडी अंती दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी तलाठी संदीप विठ्ठलराव ढोक यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अँन्टी करप्शन ब्यूरोचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी सांगितले.