मी केवळ जनतेचा आमदार असं म्हणणारे लालाजी निराळेच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By नितिन गव्हाळे | Published: November 4, 2023 02:30 PM2023-11-04T14:30:21+5:302023-11-04T14:30:39+5:30
आ. शर्मा यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटूंबियांचे केले सांत्वन
नितीन गव्हाळे
अकोला: लालाजींशिवाय अकोल्याची कल्पना करवत नाही. वर्षानुवर्ष अकोल्याला यायचे म्हणजे, लालाजी. अशा प्रकारची आमची भावना होती. राजकारणामध्ये त्यांच्यासारखे व्यक्तीमत्व फार कमी आहेत. निस्वार्थ काय असतं. याचे ते उदाहरण होते. ते असे नेते होते की, राज्यमंत्रीपद मिळालेलं असूनही सोडून देत, मी केवळ जनतेचा आमदार असे म्हणणारे गोवर्धन शर्मा हे निराळेच व्यक्तीमत्व होते. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना, शनिवार ४ ऑक्टोबर रोजी फडणवीस यांनी त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी लालाजींच्या पत्नी गंगोदेवी शर्मा, ज्येष्ठ चिरंजिव कृष्णा शर्मा, प्रा. अनुप शर्मा यांचे सांत्वन केले.
अनेक आठवणी सांगताना, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लालाजी निवडणुकीत उभे राहायचे नाही. असे ठरवायचे. पण आमच्या आग्रहाखातर ते निवडणूक लढवायचे आणि जिंकुनसुद्धा यायचे. जनतेचे प्रेम लाभलेला नेता...ही त्यांची ओळख होती. त्यांचे निधन हे आमच्यासाठी धक्कादायक आहे.
अकोल्याला नेण्यासाठी लालाजींचा आग्रह
आमदार गोवर्धन यांच्यावर मुंबईतील हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. तेव्हा त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती. त्यांनी कुटूंबियांकडे अकोल्याला नेण्याचा आग्रह धरला होता. अकोल्यातच मृत्यू यावा. अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे कुटूंबियांनी डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांना अकोल्यात आणले.
ते पत्र आणायचे, मी सही करायचो!
आमदार शर्मा यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांची राहिली. मी वयाने लहान असून, त्यांनी जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबध जपले होते. मुख्यमंत्री म्हणून एखादं काम घेऊन लालाजी यायचे आणि हक्काने हे पत्र आहे, त्यावर मला सही करायला सांगायचे आणि मीही सरळ सही करायचो. ते नेहमीच जनतेसाठीच मागत राहिले. युती सरकारच्या काळात त्यांना राज्यमंत्री केले. ते एकमेव राज्यमंत्री आहे की, त्यांनी पक्षाकडे मला मंत्रीपद नको, आमदारच राहु द्या. असे सांगुन त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. १५ वर्ष रेल्वेगाडीत त्यांच्यासोबत प्रवास केला. २५ वर्ष विधानसभेत त्यांच्यासोबत काम केले. अशी आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.