अकोला, बार्शीटाकळी तालुक्यात लम्पीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:56 AM2020-10-02T10:56:58+5:302020-10-02T10:57:21+5:30

Akola News : जिल्ह्यातील गोवंशांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘लम्पी’ या त्वचा विकाराची लक्षणे दिसून येत आहेत.

Lampi's report in Akola, Barshitakali taluka 'positive'! | अकोला, बार्शीटाकळी तालुक्यात लम्पीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’!

अकोला, बार्शीटाकळी तालुक्यात लम्पीचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात गोवंशावर ‘लम्पी’ या त्वचा विकाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आजारी गोवंशांचे नमुने ‘रिजनल डिसीस इन्व्हेस्टिगेशन लॅब’ने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविले होते. यातील अकोला आणि बार्शीटाकळी तालुक्यातील गोवंशांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील गोवंशांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘लम्पी’ या त्वचा विकाराची लक्षणे दिसून येत आहेत. या आजारामुळे गोवंशाच्या शरीरावर अचानक सूज येत असून, हलका ताप आणि सर्दीही आढळून येत आहे. तसेच गोवंशाच्या शरीरावर गाठीदेखील आढळून येत आहेत. हा संसर्गजन्य आजार असून, संक्रमित पशूंच्या संपर्कात आलेल्या पशूंना त्यापासून धोका संभवू शकतो. जिल्ह्यात लम्पीच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या तक्रारीनंतर पशू विभागातर्फे जिल्ह्यातील ३३ नमुने वैद्यकीय तपासणीसाठी भोपाळ येथील ‘हाय सिक्युरिटी अ‍ॅॅनिमल डिसीज लॅब’मध्ये पाठविण्यात आले होते. यातील काही नमुन्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. यामध्ये अकोला आणि बार्शीटाकळी तालुक्यातील गोवंशाचा समावेश आहे. तर अकोला आणि तेल्हारा तालुक्यातील गोवंशांच्या नमुन्याच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव आढळला आहे, अशा गावांमध्ये शून्य ते पाच किलोमीटर अंतरावरील पशूंना लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.


जिल्ह्यात पशूंमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहता काही नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील काही नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पशुपालकांनी गोचीड निर्मूलनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- डॉ. नम्रता बाभुळकर, सहायक आयुक्त, रिजनल डीसीज इन्व्हेस्टिगेशन लॅब, अकोला

 

Web Title: Lampi's report in Akola, Barshitakali taluka 'positive'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला