मोबाइलच्या जमान्यातही लँडलाइनची ‘ट्रिंग ट्रिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:51+5:302021-09-03T04:19:51+5:30

अकोला : दूरसंचार क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून, सध्या मोबाइल फोनची चलती आहे. मोबाइल नेटवर्कची वाटचाल आता ...

Landline's 'tring tring' even in the age of mobile | मोबाइलच्या जमान्यातही लँडलाइनची ‘ट्रिंग ट्रिंग’

मोबाइलच्या जमान्यातही लँडलाइनची ‘ट्रिंग ट्रिंग’

Next

अकोला : दूरसंचार क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून, सध्या मोबाइल फोनची चलती आहे. मोबाइल नेटवर्कची वाटचाल आता फोर जीकडून फाइव्ह जीकडे सुरू झाली आहे. मोबाइलच्या या जमान्यात एकेकाळी मोठी क्रेझ असलेले लँडलाइन फोन मात्र लुप्त होत असले, तरी आपले अस्तित्व टिकवून आहेत. अकोला जिल्ह्यात आजच्या घडीला ६,६३५ लँडलाइन फोन कार्यान्वित असल्याची माहिती समोर आली आहे.

एकेकाळी घरी फोन असेण ही चैन समजली जायची. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची तेव्हा मक्तेदारी होती. या कंपनीकडून लँडलाइन सेवा पुरविली जात असे. आताही लँडलाइनमध्ये बीएसएनएल हीच कंपनी सेवा पुरविते. काळ बदलत गेला तसा दूरसंचार क्षेत्रात मोठे बदल झाले. लँडलाइन काळाच्या ओघात मागे पडले व आता प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन दिसतो. असे असले, तरी अजूनही शासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये लँडलाइन फोन आपले अस्तित्व टिकून आहेत.

केवळ ६,६३५ लँडलाइन

बीएएनएलद्वारे लँडलाइन सेवा पुरविली जाते. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी १५ हजारांवर लँडलाइनधारक होते. परंतु, गत काही वर्षांमध्ये स्वस्त: कॉल सुविधा देणाऱ्या मोबाइल फोनला पसंती मिळत गेली व लँडलाइन फोन हळूहळू कमी होत गेले. जिल्ह्यात आता केवळ ६,६३५ लँडलाइन कनेक्शन असल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटीडी बूथ, क्वाइनबॉक्स हद्दपार

आजपासून साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी एसटीडी पीसीओ बूथ प्रचंड लोकप्रिय होते. घरी फोन नसलेल्यांसाठी हे बुथ मोठा आधार होते. त्यानंतर क्वाइनबॉक्सचा जमाना आला. एक रुपयात कॉल ही सुविधा त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. बीएसएनएल शिवाय इतर खासगी कंपन्यादेखील क्वाइनबॉक्सची सुविधा देत होत्या. मोबाइल क्रांतीमुळे या दोन्ही सेवा आता हद्दपार झाल्या आहेत.

१७१३ फायबर ऑप्टिक कनेक्शन

बीएएनएल ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंटरनेटसाठी सेवा पुरविते. यासाठी कंपनीने जिल्हाभरात फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकले आहे. जिल्ह्यात सध्या १७१३ फायबर ऑप्टिक कनेक्शन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

म्हणून लॅण्डलाइन आवश्यकच

माझ्याकडे गत २२ वर्षांपासून लँडलाइन फोन आहे. जुन्या ग्राहकांकडे माझा लँडलाइन नंबर असल्यामुळे मी तो कायम ठेवला असून, यापुढेही कायम ठेवणार आहे. अत्यंत कमी खर्चात ही सुविधा असून, लँडलाइन फोनसोबत आमचे भावनिक नाते जुळले आहे.

- गोपीअण्णा चाकर, अकोला

आमच्या घरातील सर्व सदस्यांकडे मोबाइल असल्यावरही घरात मात्र लँडलाइन फोन आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी लँडलाइन फोनची सुविधा चांगली आहे. टेबलवरील फोन म्हणजे घराची शान आहे.

- सुरेश टेकाडे, अकोला

Web Title: Landline's 'tring tring' even in the age of mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.