भूसुरुंग निकामी करून बांग्लादेशकडे केली कूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:01+5:302021-08-15T04:21:01+5:30
अकोला : १९७१ च्या युद्धात भारत-पाकिस्तानच्या युद्धात ऑर्डनन्स विभागाचे योद्धा म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या प्रल्हाद गुजर यांनी महत्त्वाची भूमिका ...
अकोला : १९७१ च्या युद्धात भारत-पाकिस्तानच्या युद्धात ऑर्डनन्स विभागाचे योद्धा म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या प्रल्हाद गुजर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बांग्लादेशात घुसण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय सैन्याच्या वाटेत भूसुरुंग पेरण्यात आले होेेते. यावेळी त्यांनी सीमेवर जाऊन हे भूसुरुंग निकामी केले व भारतीय सैन्याने बांग्लादेशकडे कूच केली. या युद्धात अनुभवलेल्या थरारक क्षणांना त्यांनी ‘लोकमत’ सोबत बोलताना उजाळा दिला. डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत-पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात प्रल्हाद गुजर यांनीही सहभाग नोंदविला होता. प्रल्हाद गुजर हे १९६२ ला भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांचे प्रशिक्षण होत नाही तोच त्यांना चीनसोबत झालेल्या युद्धात सहभागी व्हावे लागले. त्यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धातही प्रत्यक्ष सहभागी होत थरार अनुभवला. ते सांगताना म्हणाले, युद्धाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली. भारतीय सैन्य बांग्लादेशमध्ये कूच करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी बांग्लादेशच्या सीमेवर पाक सैन्याने भूसुरुंग पेरले. या भूसुरुंगावर केवळ २०० ग्रॅम वजन पडल्यास विस्फोट होत होता. यावेळी प्रल्हाद गुजर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यावेळी ते जेसोर सेक्टरमध्ये कार्यरत होते. त्यांनी टीमसोबत बांग्लादेश सीमेवर जात सर्व भूसुरुंगांचा शोध लावला. हे भूसुरुंग निकामी करीत भारतीय सैन्याला पुढील वाट मोकळी करून दिली. १९९४ साली ते सुभेदार मेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले.
या युद्धांमध्ये सहभाग
१९६२ साली चीनसोबत झालेल्या युद्धात, १९६५ साली पाकिस्तानसोबत, १९७१ बांग्लादेशासोबत, तसेच ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला होता. या युद्धांमध्ये दाखविलेल्या शौर्यामुळे त्यांनी पश्चिमी स्टार, पूर्वी स्टार हे पदक मिळाले.
देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवा वर्गामध्ये देश आहे तर आपण आहोत, अशी भावना पाहिजे.
- प्रल्हाद गुजर, सेवानिवृत्त सैनिक