वॉरंटी कालावधीत बिघडला लॅपटॉप; ग्राहक मंचचा दुकानदारास दणका
By सचिन राऊत | Published: March 22, 2024 07:45 PM2024-03-22T19:45:42+5:302024-03-22T19:45:53+5:30
ग्राहक मंचाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, सदस्य सुहास आळशी, नीलिमा बेलोकार यांनी हा आदेश बजावला.
अकोला: शहरातील एका दुकानातून खरेदी केलेल्या लॅपटाॅपची एक वर्षाची वारंटी असतांना ताे सातव्या महीन्यातच बंद पडला असता दुकानदाराने ताे बदलूनही दिला नाही दुरुस्तही करून दिला नाही. त्यामूळे ग्राहकाने या विराेधात ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात धाव घेतली असता मंचाने दुकानदारास फटकारत ग्राहकास लॅपटाॅप देण्याचा आदेश दिला आहे.
एसटी कॉलनी परिसरातील रहिवासी रजनी नंदलाल सावळे व त्यांचे पती नंदलाल सावळे यांनी रणपिसे नगर येथील सिग्मा कॅम्पुटरमधून अशर कंपनीचा नवीन लॅपटॉप खरेदी केला होता. लॅपटॉपमध्ये कोणताही निर्मिती दोष असल्यास तो निशुल्क व आवश्यकतेनुसार पार्ट बदलून, दुरुस्त करून दिल्या जाईल असे एक वर्षाच्या वॉरंटी पिरियड मध्ये नमूद करण्यात आले होते. खरेदी केल्याच्या सात महिन्यात प्रस्तुत लॅपटॉप बंद पडला. नंदलाल सावळे यांनी या संदर्भात दुकानदारास माहिती दिली. मात्र दुकानदाराने लॅपटॉप वॉरंटीत असूनही दीड महिना चालढकल केली. यानंतर पुन्हा दुकानदारास लॅपटॉप संदर्भात विचारणा केली असता लॅपटॉप वॉरंटी पिरियडमध्ये नसल्याचे सांगितले. सावळे यांनी हा लॅपटॉप वारंटीत असल्याची बाब निदर्शनास आणल्यावर टेक्निशियनने हा लॅपटॉप दुरुस्त केला. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा लॅपटॉप बंद पडला.
सावळे यांनी या संदर्भात पुन्हा आपली तक्रार नोंदवली. टेक्निशियनने पुन्हा सावळे यांचा लॅपटॉप दुरुस्त केला मात्र पुन्हा ताेच प्राॅब्लेम झाल्याने तसेच वारंवार दुरुस्ती करूनही तो नादुरुस्त होत असल्याने लॅपटॉपमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सावळे यांच्या निदर्शनास आले. त्यामूळे सावळे यांनी दुकानदार व अशर कंपनीविरुद्ध ग्राहक मंचात क्षतीपूर्तीची तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाने कंपनी, दुकानदार व तक्रारदार सावळे यांचे म्हणणे ऐकून तक्रारदार सावळे यांनी घेतलेल्या लॅपटॉपऐवजी नवीन लॅपटॉप एक वर्षाच्या वॉरंटी समवेत देऊन तक्रारदाराला शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासापाेटी सात हजार रुपये व प्रकरण खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश बजावलेत. ग्राहक मंचाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, सदस्य सुहास आळशी, नीलिमा बेलोकार यांनी हा आदेश बजावला.