धान्य चोरणारी मोठी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:14 AM2021-06-19T04:14:07+5:302021-06-19T04:14:07+5:30
अकोला : बार्शीटाकळी व बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदाम फोडून त्यामधील धान्य चोरणाऱ्या मोठ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी ...
अकोला : बार्शीटाकळी व बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदाम फोडून त्यामधील धान्य चोरणाऱ्या मोठ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे चार लाख ५१ हजार रुपयांचा धान्य साठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन संशयास्पदरीत्या चालविण्यात येत असल्याचे या पथकाच्या लक्षात आले. यावरून पथकाने वाहनाचा पाठलाग करून ते वाहन अडविले. यामधील विश्वनाथ किसन चौके (वय ३९ वर्षे, रा. असादुधा, ता. खामगाव, जि. बुलडाणा) व बाळकृष्ण रतीराम मेहेंगे (वय ४५ वर्षे, रा. शेगाव) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून चौकशी सुरू करताच दोन्ही आरोपींनी धान्य चोरीची कबुली दिली. या दोन जणांनी त्यांचे साथीदार गजानन प्रल्हाद करांगळे व ज्ञानदेव त्र्यंबक बघे (दोघे रा. तित्रव, ता. बार्शीटाकळी) यांच्यासोबत बार्शीटाकळी व बाळापूर तालुक्यातील गोदाम फोडून धान्य चोरल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी या दोन चोरट्यांकडून एक चारचाकी वाहन व मुद्देमाल असा एकूण ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामधील दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, तर फरार असलेल्या दोन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, प्रमोद डोईफोडे, मनोज नागमोते, प्रवीण कश्यप व अनिल राठोड यांनी केली.