सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या आहारात आढळल्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 01:33 PM2019-09-29T13:33:15+5:302019-09-29T13:36:30+5:30
वॉर्ड क्रमांक १९ मध्ये एका रुग्णाच्या भोजनात अळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
- प्रवीण खेते
अकोला: रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक आहारात अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालयात समोर आला. हा प्रकार वॉर्ड क्रमांक १९ मध्ये शासकीय मेसमधील शिजवलेले अन्न रुग्णांना वितरित केल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून, हे अन्न शासकीय मेसमधील नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी पौष्टिक आहार देण्याचे शासनाचे धोरण आहे. काही महिन्यांपूर्वीच या पौष्टिक आहाराचे सुधारित वेळापत्रक आरोग्य विभागातर्फे तयार करण्यात आले होते. त्यानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय मेसमध्ये रुग्णांसाठी नियमित अन्न पदार्थ शिजवल्या जातात. वॉर्डात दाखल रुग्णांना दररोज हे पौष्टिक अन्न देण्यात येते. नेहमीप्रमाणे गुरुवारीही रात्री ७ वाजताच्या सुमारास शासकीय मेसमध्ये शिजवलेले अन्न विविध वॉर्डातील रुग्णांना वितरित करण्यात आले; परंतु वॉर्ड क्रमांक १९ मध्ये एका रुग्णाच्या भोजनात अळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त रुग्णाने या प्रकरणी डॉक्टरांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. त्यानंतर हा प्रकार अधिष्ठातांपर्यंत पोहोचला. या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधला असता रुग्णांना दिलेले भोजन हे शासकीय मेसमधील नसल्याचे सांगण्यात आले; मात्र वैद्यकीय सूत्रांनी सांगितल्यानुसार, गुरुवारी रुग्णांना वितरित भोजन हे शासकीय मेसमार्फतच वितरित करण्यात आले होते.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
शासकीय मेसमधील शिजवलेल्या अन्नात अळ्या निघाल्याने सर्वोपचार रुग्णालय वर्तुळात एकच खळबळ उडाली; परंतु यानंतर हा प्रकार सावरण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, रुग्णाला दिलेले हे अन्न शासकीय मेसमध्ये शिजवलेले नसल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
खासगी लोकांकडूनही भोजनाचे वितरण
शासकीय मेस व्यतिरिक्त सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना दोन वेळचे भोजन वितरित केले जाते. यापूर्वी या भोजनामध्येही अळ्या आढळून आल्याचा प्रकार घडला होता.
वॉर्ड क्रमांक १९ मध्ये रुग्णाला वितरित करण्यात आलेल्या भोजनात अळी आढळल्याची तक्रार आलेली आहे; परंतु हे भोजन शासकीय मेसमधील आहे की, खासगीतून मिळालेले आहे, याबाबत ठोस सांगता येणार नाही. या प्रकरणाचे सखोल चौकशी करण्यात येणार असून, रुग्णांपर्यंत पौष्टिक आहार पोहोचविण्यावर भर राहील.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला