Video - सर्वोपचारमधील रुग्णांच्या जेवणात निघाल्या अळ्या, किडे
By सचिन राऊत | Published: December 29, 2023 06:33 PM2023-12-29T18:33:57+5:302023-12-29T18:40:40+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३१ मध्ये शुक्रवारी देण्यात आलेल्या जेवणात चक्क किडे व ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३१ मध्ये शुक्रवारी देण्यात आलेल्या जेवणात चक्क किडे व अळ्या निघाल्याचा धक्कादायक तसेच किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणातील अळ्या व किडे रुग्णाच्या ताटात निघाल्यानंतर त्यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र येथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे ताट व ताटातील अन्न फेकून देत रुग्णास रुग्णालयाच्या बाहेर काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या गलथान कारभाराने कळस गाठल्याचे वास्तव आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आलेले आहे. डॉक्टरांच्या तसेच प्रशिक्षणार्थ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचेही आरोप झाले आहेत. वाढती रुग्णसंख्या व त्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ असल्याच्या नेहमीच ओरड असल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची प्रशासनाची बाजू आहे; मात्र अन्नपदार्थांमध्ये चक्क किडे आणि अळ्या निघाल्यानंतर प्रशासनाने यावर उपाययोजना न करता हा प्रकार लक्षात आणून देणाऱ्या रुग्णासच धाकदपट करीत बाहेर काढून दिले. रुग्णाच्या ताटातील अन्नपदार्थांमध्ये किडे व अळ्या वळवळ करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसा व्हिडिओही सर्वत्र व्हायरल झालेला आहे. मात्र त्यानंतरही प्रशासनाने अद्याप संबंधित दोशींवर कारवाई न केल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अकोला - सर्वोपचारमधील रुग्णांच्या जेवणात निघाल्या अळ्या, किडे, प्रशासनाच्या प्रकार लक्षात आणून देताच कर्मचाऱ्यांनी जेवण फेकले pic.twitter.com/wJBouKrtM9
— Lokmat (@lokmat) December 29, 2023
संत गजानन महाराज संस्थानशी करावा करार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सरोपचार रुग्णालय येथील रुग्णांच्या जेवणासाठी श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान यांच्याशी करार करावा अशी मागणीही मनसेचे राकेश काळे यांनी यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांच्याकडे केल्याची माहिती आहे.
या रुग्णाच्या जेवणात निघाल्या अळ्या व किडे
उगवा येथील रहिवासी उकर्डा बळीराम मेहरे या रुग्णास वार्ड क्रमांक ३१ मध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना शुक्रवारी दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान जेवणाचे ताट देण्यात आले. याच ताटात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये किडे व अळ्या असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांना सांगितला तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताटातील अन्न फेकून दिले व रुग्णासही बाहेर काढून दिलयाचा आरोप मेहरे यांनी केला आहे.
दोषींवर कारवाईसाठी मनसे आक्रमक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांच्या ताटात व जेवणात किडे आणि अळ्या निघाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश काळे यांनी तात्काळ दखल घेत दोशींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही राजेश काळे यांनी दिला. रुग्णांना जनावरापेक्षाही खालच्या दर्जाचे जेवण देणाऱ्या कंत्राटदारावरही कारवाई करण्याची मागणी राजेश काळे यांनी केली.