अखेरच्या क्षणी उलथापालथ !
By admin | Published: February 4, 2017 02:45 AM2017-02-04T02:45:28+5:302017-02-04T02:45:28+5:30
महापौरांना नाकारले तिकीट; काँग्रेसच्या उषा विरक पतीसह राष्ट्रवादीत.
अकोला, दि. 0३- महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये महासंग्राम रंगला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय सारीपाटावर प्रचंड उलथापालथ झाली. भाजपने विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख यांना तिकीट नाकारून अनेकांना धक्का दिला, तर दुसरीकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांनी अंतिम क्षणी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघाने सर्वच ८0 जागांवर उमेदवार उभे केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अवधी दिला होता. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ह्यएबी फॉर्मह्णचे वाटपच केले नाही. साहजिकच, इच्छुकांचे डोळे याद्यांकडे लागले होते. इच्छुकांच्या हातामध्ये एबी फॉर्म न देता त्याने काढलेल्या ऑनलाइन अर्जाच्या प्रिंटला एबी फॉर्म जोडण्याचे काम पक्षाच्या पदाधिकार्यांनी केले. त्यामुळे ज्या उमेदवारांचा पत्ता कट करायचा होता, त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवण्यात आल्याचे समोर आले.
भाजपने तर चक्क विद्यमान महापौर उज्जवला देशमुख यांना उमेदवारी नाकारून सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. प्रभाग क्रमांक १0 मधील विद्यमान नगरसेवक योगेश गोतमारे यांनाही तिकीट नाकारले, तर दुसरीकडे गेल्या निवडणुकीत पक्षासोबत बंडखोरी करून अपक्ष निवडून येणार्या संजय बडोणे, माधुरी बडोणे यांना उमेदवारी दिली. अंतर्गत कलहाची लागण इतरही पक्षांना झाली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांनी प्रभाग क्रमांक १२ मधून स्वत:सह त्यांचे पती जगजितसिंग विरक यांच्यासाठी तिकीट मागितले होते. पक्षाने दोन तिकिटे देण्यास नकार दिल्यानंतर उषा विरक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून दोन तिकिटे पदरात पाडून घेतली.
नगरसेवकांना संधी; गटनेत्यांना नाकारले
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघाने विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. महापालिकेत पक्षहिताला प्राधान्य देणार्या गटनेत्यांपैकी भाजपच्यावतीने प्रभाग १0 मधून वैशाली शेळके, शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके, काँग्रेसचे गटनेता साजीद खान यांना प्रभाग ७ मध्ये उमेदवारी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता राजू मुलचंदानी यांना पक्षाने तिकीट नाकारले. भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांच्याऐवजी त्यांच्या सुविद्य पत्नी यांना प्रभाग १८ मधून उमेदवारी मिळाली आहे.