अखेर तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या कामाचा मुहूर्त निघाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:19 AM2021-05-18T04:19:11+5:302021-05-18T04:19:11+5:30
तालुक्यातील आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड, वरवट-तेल्हारा, वणीवारुळा फाटा या चार मुख्य रस्त्यांवर २०० कोटी रुपये खर्च होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच या ...
तालुक्यातील आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड, वरवट-तेल्हारा, वणीवारुळा फाटा या चार मुख्य रस्त्यांवर २०० कोटी रुपये खर्च होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच या कामाला सुरुवात झाली होती. मात्र ज्या कंत्राटदाराने हे काम घेतले. त्या कंत्राटदाराने कुठलेही नियोजन न करता कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे चारही बाजूंनी सर्व रस्ते अनेक महिन्यांपासून खोदून ठेवले होते. कुठे माती तर कुठे गिट्टी टाकून अर्धवट काम करून ठेवले होते. अनेकदा संबंधित कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र त्यावर त्यांना यश मिळत नसल्याने व दुसरी कोणती एजन्सी काम करण्यास तयार नसल्याने काम बंद होते. या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले. गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत होता, मात्र आता या रस्त्याचे काम सुरू होत असल्याची माहिती मिळाल्याने जनतेला दिलासा मिळाला.
आता सुरू झालेले काम बंद पडू नये!
आता रस्त्याचे सुरू झालेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद पडणार याची संबंधित कंत्राटदार व संबंधित विभागाने दक्षता घ्याव, अशीसुद्धा मागणी होत आहे.
संबंधित रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून बंद होते. मात्र आजपासून हे काम सुरू होणार आहे. काम पुन्हा बंद पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. असे बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय बोचे यांनी सांगितले.