'शकुंतलेला' अखेरची घरघर : मूर्तिजापूर-अचलपूर-यवतमाळ फेरी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 06:32 PM2019-05-17T18:32:23+5:302019-05-17T18:36:50+5:30
काही काळातच शकुंतला पॅसेजर बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याच बरोबर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा जंक्शन दर्जाही संपुष्टात येणार आहे.
- संजय उमक
मूर्तिजापूर: ब्रिटिश सरकारने सुरू केलेली ‘शकुंतला’ मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर - यवतमाळ पॅसेंजर फेरी अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे शकुंतला अखेरच्या घटका मोजत आहे. काही काळातच शकुंतला पॅसेजर बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याच बरोबर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा जंक्शन दर्जाही संपुष्टात येणार आहे.
मूर्तिजापूर-यवतमाळ व मूर्तिजापूर-अचलपूर अशा दोन शकुंतला पॅसेंजर या रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.१५ वाजता धावतात; परंतु मूर्तिजापूर- यवतमाळ ही शकुंतला पॅसेंजर काही कारणास्तव अनेक महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मूर्तिजापूर-अचलपूर ही गाडीसुद्धा बंद करण्यात आली. मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर-यवतमाळ मार्गे धावणारी शकुंतला पॅसेंजर येत्या आठ-दिवसात रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात शकुंतलेच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुंबईवरून रेल्वे अधिकाऱ्यांचे विशेष पथक मूर्तिजापूर येथे येऊन गेले आहे. शकुंतला रेल्वे प्रचंड तोट्यात असल्याने ती चालविणे आता रेल्वे प्रशासनाला जिकिरीचे झाले असल्याचे सांगून येत्या आठ-दहा दिवसात शकुंतला कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे येथे असलेला ‘जंक्शन’ दर्जाही जाणार आहे.
ब्रिटिशकालीन असलेली शकुंतला १९०३ मध्ये भारतात क्लिक अॅण्ड निक्सन या ब्रिटिश कंपनी कंपनीने सुरू केलेल्या वाफेवर चालणारे इंजीन घेऊन अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ ही पहिली ७ डब्यांची छोटी पॅसेंजर गाडी १८९ किलोमीटरचे अंतर पार करायची. कालांतराने मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर-यवतमाळ या ४ डब्यांच्या दोन गाड्या सुरू करण्यात आल्या. पूर्वी वाफेवर धावणारे इंजीन काढून १५ एप्रिल १९९४ तिला डीझल इंजीन जोडण्यात आले. फक्त एवढीच प्रगती या गाडीने केली. या गाडीचा क्लिक अॅण्ड निक्सन या ब्रिटिश कंपनीशी असलेला करार १९९५ मध्ये संपुष्टात आल्याने जणू ती गुलामगिरीतून मुक्तच झाली असली तरी लगान म्हणून भारत सरकारकडून १ कोटी २० लाख रुपये अजूनही द्यावे लागत असल्याने आजही ती गुलामगिरीतून मुक्त झाली का, असा प्रश्न निर्माण होतो.
या रेल्वे लाईनची निर्मिती ब्रिटीशांनी अचलपूर - यवतमाळ मोठी कापूस व्यापारपेठ असल्याने कापूस मालाची ने-आण करण्याच्या मुख्य उद्देश्याने केली होती. इंजिनची धावण्याची क्षमता कमी असल्याने ताशी २० ते २५ किलोमीटर धावते. ही गाडी प्रचंड तोट्यात असल्याने अनेक वेळा बंद करण्यात आली होती. सन २०१४ व २०१६ मध्ये ती सलग बंद करण्यात आली होती.स्थानिक जनतेच्या मागणी केल्याने ती पुन्हा सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत मूर्तिजापूर- यवतमाळ, मूर्तिजापूर - अचलपूर धावणाºया या दोन्ही गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. या लोहमार्गाचे रुंदीकरण करुन शकुंतलेला नवीन स्वरूप देऊन तिच्यात नवचैतन्य निर्माण करावे अशी मागणी या प्रसंगी जोर धरू लागली आहे.
लोकप्रतिनिधी उदासीन
शकुंतलेची रेल्वे लाईन असल्याने मूर्तिजापूर स्टेशन जंक्शन म्हणून ओळखले जायचे. परंतु आता शकुंतला कायम बंद होणार असल्याने बंद होणार असल्याने या स्टेशनचा जंक्शन दर्जा जाणार आहे. जंक्शन स्टेशन असताना सुद्धा येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा नाही. लांब पल्ल््याच्या गाड्या येथे थांबवाव्यात म्हणून आतापर्यंत अनेक निवेदने देऊन आंदोलने सुध्दा करण्यात आली. परंतु निगरगट्ट शासन व सुस्तावलेले जनप्रतिनिधी असल्याने गाड्यांचे थांबे येथे होऊ शकले नाही.त्यातल्या त्यात आता शकुंतला सुध्दा बंद होणार आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे दुर्लक्ष करीत असल्यानेच असे प्रकार मूर्तिजापूरात घडत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधुन येत आहे.
'शकुंतला' नामकरण
अमरावतीचे तत्कालीन खासदार कॉं. सुदामकाका देशमुख यांनी या गाडीतून प्रवास केला होता. प्रवासादरम्यान गाडी खूपच हळूहळू चालत असल्याने उपरोधाने या गाडीला 'शकुंतला' संबोधन दिल्याने तेव्हा पासून या गाडीचे 'शकुंतला' असे नामकरण झाल्याचे बोलल्या जाते.
शकुंतला रेल्वे बंद झाल्याने जंक्शन दर्जा जाणार आहे.परंतु मूर्तिजापूर स्टेशन 'बी' दर्जाचे असल्याने हा दर्जा कायम राहणार असून इतर गाड्यांच्या थांब्यावर काहीही फरक पडणार नाही. स्टेशनचा दर्जा केवळ सिग्नल व्यवस्थेवर अवलंबून असतो.
टी. आर. सवई, स्टेशन प्रबंधक, मूर्तिजापूर